पंतप्रधानांच्या मुंबईतील कार्यक्रमस्थळी घुसखोरीचा प्रयत्न? बनावट सरकारी ओळखपत्रासह दोघांना अटक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे संशयास्पद सरकारी ओळखपत्राचा वापर करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यातील एका तरुणाकडे पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवणारे बनावट ओळखपत्र आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. त्याच्यासोबत असलेल्या कथित अंगरक्षकाकडे बंदूकही आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रोहन पारिख (२४) असल्याचे समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी तो स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याकडे असलेल्या ओळखपत्रावर त्याचा फोटो होता; मात्र तपासणी केल्यानंतर हे ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
सुरक्षा तपासणीदरम्यान त्याच्यासोबत एक तरुण अंगरक्षक म्हणून असल्याचे आढळले. त्याच्याकडे बंदूक सापडल्याने सुरक्षा यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून, ते परवानाधारक असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात सरकारी अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र धारण करणे, शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीररीत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
रोहन पारिखने बनावट ओळखपत्र का तयार केले, कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागील त्याचा नेमका उद्देश काय होता आणि शस्त्रधारी तरुणाला अंगरक्षक म्हणून सोबत आणण्याचे कारण काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. संबंधित शस्त्र परवानाधारक असल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच ही घटना पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, बनावट सरकारी ओळखपत्राच्या आधारे संवेदनशील ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.