अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ हल्ल्याचा प्रयत्न
सशस्त्र घुसखोर व्यक्तीवर गोळीबार : गुप्तहेर यंत्रणेकडून वेळीच दक्षता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसजवळ रविवारी अमेरिकन गुप्तचर सेवेच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. एक सशस्त्र व्यक्ती व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. याचदरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या गुप्तहेर सेवा एजंटांशी झालेल्या झटापटीनंतर त्या व्यक्तीवर गोळ्या घालण्यात आल्या. या चकमकीत तो जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर व्यक्तीची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नसून त्याची अधिक चौकशी केली जात असल्याचे समजते. या गोळीबाराच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये नव्हते. ट्रम्प फ्लोरिडामध्ये असल्याची माहिती देण्यात आली.
स्थानिक पोलिसांनी इंडियानाहून वॉशिंग्टन डीसीला प्रवास करणाऱ्या एका ‘आत्मघाती’ हल्लेखोराची गुप्तचर यंत्रणेला सूचना दिली होती. याचदरम्यान गुप्तचर सेवा एजंट्सना ‘एफ स्ट्रीट्स, एनडब्ल्यू’जवळ पार्क केलेली त्या माणसाची गाडी दिसली. तसेच गाडीजवळ उभा असलेला व्यक्ती स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीशी साधर्म्य साधणारा होता. गुप्तचर सेवा एजंटांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने शस्त्र बाहेर काढल्यानंतर जवानांनी हल्लेखोरावर गोळी झाडली. गुप्तहेर विभागाच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांना तो माणूस हल्ला करण्याच्या पवित्र्यात असल्याचे कळल्यानंतर सशस्त्र चकमक झाली.
सदर व्यक्तीने अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु घटनेनंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेत इतर कोणीही जखमी झाले नाही. ही चकमक व्हाईट हाऊसपासून अवघ्या काही मीटर अंतरावर झाली. कायदा अंमलबजावणी अधिकारी यात सहभागी असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी महानगर पोलीस विभागाकडून केली जाईल असे गुप्तचर सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.