संदीप घोष यांच्यावर थप्पड मारण्याचा प्रयत्न
न्यायालयात हजर करतेवेळी जोरदार घोषणाबाजी
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना जमावातील एका व्यक्तीने थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. सीबीआयने घोष यांना अलीपूर न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असताना हा प्रकार घडला आहे. घोष यांना पाहताच आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र, नंतर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. न्यायालयाने घोष आणि अन्य तिघांना 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. घोष यांच्यावर आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. घोष यांना 2 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी, 28 ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने संदीप घोष यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने घोष यांना निलंबित केले होते.