स्मार्ट सिटीचे बोर्ड लावून गवगवा करण्याचा प्रयत्न
विकासकामांच्या दर्जाबाबत मात्र प्रश्नचिन्ह : अनेक समस्या जैसे थे
बेळगाव : शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करून विकासकामे राबविण्यात आली. कामांच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांमधून नाराजीचा सूर होता. असे असतानाही घिसाडघाईने काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे शहरात अनेक समस्या उद्भवल्या आहेत. परंतु बेळगाव शहर हे स्मार्ट सिटी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न डिजिटल बोर्ड लावून केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये टप्प्याटप्प्याने स्मार्ट सिटीचे बोर्ड लावले जात आहे. सुरुवातील शहराच्या दक्षिण भागामध्ये डिजिटल बोर्ड लावण्यात आले. आता शहराच्या उत्तर भागात बोर्ड लावले जात आहेत. संगोळ्ळी रायाण्णा रोडवर बुधवारी सकाळपासून डिजिटल बोर्ड लावण्यात येत आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहराचा वेगळा चेहरा दाखविण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आला.
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर रस्ते, गटारीसह अनेक नवीन प्रकल्प शहरात राबविण्यात आले. परंतु सर्वच प्रकल्प अपयशी ठरत असल्याचे दिसून आले. रस्ते, गटारी करताना कोणताही सारासार विचार न करता काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही दुरुस्तीसाठी वरचेवर खोदाई करावी लागत आहे. स्मार्ट सिटीच्या इतर कामांमध्येही अशाच प्रकारे घिसाडघाई करण्यात आली असताना आता केवळ डिजिटल बोर्ड लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.