हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
काडसिद्धेश्वर स्वामीजींना जिल्हा बंदी केल्याचा निषेध : विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संताप
बेळगाव : हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. हिंदू एकसंध राहिला तर इतर कोणत्याही जातीय शक्ती जवळ येणार नाहीत. परंतु, अंतर्गत कलहामुळे एक दिवस देशविरोधी कारवाया करणाऱ्यांचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे कोणत्याही समाजाने हिंदू धर्म सोडू नये, असे वक्तव्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते चक्रवती सुलीबेले यांनी केले. बुधवारी काकती येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यानिमित्ताने आयोजित बैठकीला हिंदू विचारसरणीचे कार्यकर्ते तसेच स्वामीजी उपस्थित होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही दोष आहेत. अस्पृश्यता व जातीभेद हे दूर केल्यास एक सशक्त हिंदू समाज तयार होऊ शकतो. आपल्याला बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या विचारांची गरज आहे. हिंदू समाजामध्ये दरी पडली तर देशविघातक शक्ती आपले उद्देश पूर्ण करतील, याचा विचार प्रत्येक समाजाने करावा, असे ते म्हणाले.
जिल्हा बंदीचा निषेध नेंदवण्यासाठी बैठकीचे आयोजन
विजापूर व बागलकोट या जिल्ह्यात कणेरी मठाचे परमपूज्य अदृश काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यावर बंदी लादण्यात आली आहे. त्यांच्या एका वक्तव्यामुळे जिल्हा बंदी करण्यापर्यंत राज्य सरकारची मजल गेली आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींनी पारंपरिक शेती, दुग्धव्यवसाय, कृषी पर्यटन, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन एक वेगळी उंची गाठली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जिल्हा बंदीचा निषेध नेंदवण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन केल्याचे अॅड. एम. बी. जिरली यांनी सांगितले. यावेळी विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी चक्रवर्ती सुलीबेले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते शंकरगौडा पाटील, अॅड. एम. बी. जिरली, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, रमेश कत्ती, आमदार शशिकला जोल्ले, काडसिद्धेश्वर स्वामीजीसह जिल्ह्यातील स्वामीजी मोठ्या संख्येने उपस्थित होते.