अयोध्येत हनुमानगढीचे संत महेश योगींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ अयोध्या
श्रीरामाची नगरी अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिर परिसरातील भवनात राहणारे संत महेश योगी यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. शुक्रवारी पहाटे झोपेत असताना माझ्या खोलीच्या खिडकीचे गज कापून ज्वलनशील पदार्थ फेकत आग लावण्यात आली. सुदैवाने जाग आल्याने मी बाहेर पळून स्वत:चा जीव वाचविण्यास यशस्वी ठरलो असे संत महेश योगी यांनी सांगितले आहे. तर पोलीस आणि फॉरेन्सिक विभाग याप्रकरणी तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सुगावा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माझा जीव घेण्याच्या कटाच्या अंतर्गत ही आग लावण्यात आली होती. आग ज्वलनशील पदार्थांच्या माध्यमातून लावण्यात आली आहे, कारण ज्वलनशील पदार्थाचा दुर्गंध पूर्ण खोलीत पसरला होता. वेळीच आग विझविण्यात आल्याने अधिक नुकसान झाले नाही असे संत महेश योगी यांनी सांगितले. तसेच त्यांनी अन्य एका संताचे नाव घेत त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.