‘आट्टम’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, मराठीत ‘वाळवी’ची बाजी
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, मनोज बाजपेयींचा गुलमोहर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. त्याशिवाय मराठी कलाकृतींनीही विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला.
70 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘केजीएफ-2’ हा सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट ठरला असून त्यालाच सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला. ‘कांतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नित्या मेनन ही तमिळ चित्रपट तिऊचित्रंबलमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आणि मानसी पारेख गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेससाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
परेश मोकाशी यांची हॅटट्रिक
राष्ट्रीय पुरस्करांची घोषणा झाली असून वाळवी’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांनाही आवडली होती. त्यातच आता राष्ट्रीय पातळीवर या सिनेमाचा गौरव केला होणार असल्यामुळे तिसऱ्यांदा परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. हरिश्चंद्राची पॅक्ट्री, एलिझाबेथ एकादशी आणि आता वाळवी असे तिनही सिनेमे परेश मोकाशीने दिग्दर्शित केले होते. हरिश्चंद्राची पॅक्ट्री , एलिझाबेथ एकादशी या दोन्ही सिनेमांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला होता.
मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर यांचा चित्रपट गुलमोहर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवडला गेला आहे. ‘कार्तिकेय’ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. अरिजित सिंगला पार्श्वगायन प्रकारात ब्रह्मास्त्रसाठी पुरस्कार मिळाला आहे.
हॉम्बल फिल्म्सने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चार पुरस्कार जिंकले आहेत. या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवलेल्या कांताराने दोन तर केजीएफ-2 ने दोन पुरस्कार जिंकले आहेत. कांताराला सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कांतारा-2 ला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट, सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान ज्या चित्रपटांना चित्रपट सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार वितरण सोहळा ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना पदकाप्रमाणे चांदीचे कमळ किंवा सुवर्ण कमळ दिले जाते. यासोबतच रोख पारितोषिकही दिले जाते. काही श्रेणींमध्ये फक्त सुवर्ण कमळ किंवा चांदीचे कमळ प्रदान केले जाते.
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - आट्टम
सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन आणि मानसी पारेख
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - नीना गुप्ता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पवन मल्होत्रा
सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट - कांतारा
सर्वोत्कृष्ट पदार्पण - फौजा, प्रमोद कुमार
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - केजीएफ-2
सर्वोत्कृष्ट तेलगु चित्रपट - कार्तिकेय 2
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - पोनियान सेलवन भाग 1
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट - बघे दी धी
सर्वोत्कृष्ट उडिया चित्रपट - दमण
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सौदी वेलाक्का
सर्वोत्कृष्ट मेकअप - अपराजितो
सर्वोत्तम पोशाख - कच्छ एक्स्प्रेस
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - अपराजितो
सर्वोत्कृष्ट संपादन - आट्टम
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन - पोनियान सेल्वन-1
सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले - आट्टम
सर्वोत्कृष्ट संवाद - गुलमोहर
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - पोनियान सेल्वन-1
सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक - सौदी वेलाक्का
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ब्रह्मास्त्र
सर्वोत्कृष्ट समीक्षक: दीपक दुआ
सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: किशोर कुमार: द अल्टीमेट बायोग्राफी
सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म: आयना
सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट : इंटरमिशन