निरपेक्षतेने कर्म करणाऱ्याचा मोक्ष मिळणे हा विशेषाधिकार असतो
अध्याय तिसरा
भगवंत म्हणाले, जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य प्रकृतीच्या इच्छेनुसार आणि विकारांना बळी पडून कर्म करत असतो. असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो. काही लोक आम्ही संयमाने इंद्रिये ताब्यात ठेवली आहेत असे सांगत असतात पण त्यांची विषयसेवनाची इच्छा मनात तशीच असते. कर्मयोगी मात्र त्याला अपवाद असतो कारण तो निरपेक्ष असल्याने केलेल्या कर्मातून, विषय सेवनाची इच्छा होईल अशी भीती त्याला नसते. तो आशा-पाशरहित व मुक्त असल्याने खरा कर्मयोगी असतो. अर्जुना ! तू असा कर्मयोगी हो. मग कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत राहिली तरी तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. भगवंत पुढील श्लोकात अर्जुनाला म्हणतात, तू वाट्याला आलेले कर्तव्यकर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. कर्म केल्याशिवाय तुझी शरीरयात्राही उत्तम प्रकारे पार पडणार नाही.
नेमिले तू करी कर्म करणे हे चि थोर की । तुझी शरीर-यात्रा ही कर्माविण घडे चि ना । 8
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुना, युद्ध करून दुष्टांना शासन करणे हे तुझे कर्तव्य आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू युद्ध करायचे सोडून पळून गेलास तर तू कर्तव्य टाळलेस असे होईल. जो धर्माचे आचरण करतो, त्यास मोक्षाची निश्चित प्राप्ती होते. म्हणून अर्जुना, जे जे कर्म उचित असेल आणि प्रसंगाने प्राप्त झाले असेल, ते ते तू फळाची इच्छा न ठेवता आचरणात आण. अर्जुनाला भगवंतानी कर्तव्याची जाणीव करून दिली तसेच कर्तव्यकर्म टाळणे हे शास्त्राविरुद्ध होईल हेही सांगितले.
पुढे ते निष्काम कर्माचे महत्त्व सांगताना म्हणाले, निष्काम कर्म करण्याएव्हढे महत्त्वाचे काहीच नाही कारण निष्काम कर्म माणसाला कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते.
गीतेत जिथे जिथे धर्म शब्द आलेला आहे तेथे त्याचा अर्थ कर्तव्य असा आहे. नेमून दिलेले कर्म कर्मेंद्रयानी करणे हे धर्माचरण होय. जो निरपेक्षतेने कर्म करतो तो कर्मबंधनापासून आपोआप मुक्त होतो. त्याला जिवंतपणी मोक्ष मिळाल्याची प्रचिती येते. त्याला कुणाकडून कसलीच अपेक्षा नसल्याने प्रारब्धानुसार जी काही परिस्थिती प्राप्त झालेली असेल त्यात काही बदल व्हावा असे त्याला वाटत नसते. त्यामुळे तो संपूर्ण समाधानी असतो. संपूर्ण समाधानी असणे म्हणजेच मोक्षपदी आरूढ होणे होय. म्हणून जो निरपेक्षतेने कर्म करतो त्याला मोक्ष मिळणे हा त्याचा विशेषाधीकारच असतो. म्हणून हे अर्जुना, तू कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म कर असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.
यज्ञार्थ कर्म सोडूनि लोक हा बांधिला असे । यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त-संग तू । 9
पूर्वीच्याकाळी ऋषीमुनी यज्ञ करत असत. त्यांच्या यज्ञ करण्यामुळे लोकाना सुखसमृद्धीची प्राप्ती होई. एकप्रकारे यज्ञ करून देवतांना प्रसन्न करून घेणे हे ईश्वराने त्यांना नेमून दिलेले कार्यच असते त्यातून त्यांना स्वत:साठी काहीच नको असे. ते नेहमी ईश्वर चिंतनातच रहात असल्याने कायम सुखात असत आणि त्यांना धनाची, मानमरातबाची अपेक्षा नसे. ते करत असलेल्या यज्ञामुळे देवता प्रसन्न होत. देवतांनी दिलेल्या समृद्धीमुळे लोक आनंदात रहात, त्यांचे कल्याण व्हावे या उद्दात हेतूने ऋषीमुनी यज्ञकर्म करत असत. त्यामुळे प्रजा सुखी होत असल्याने राजेमहाराजेही त्यांना वंदन करत असत.
क्रमश: