इराणवर पुन्हा हल्ले करावे लागतील !
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
इराणवर आम्हाला पुन्हा हल्ले करावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. इराणने अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील तळांवर हल्ले करण्याचे सत्र चालूच ठेवले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अणुवीज प्रकल्पाच्या नजीक इराणने क्षेपणास्त्र हल्ला तीन दिवसांपूर्वी केलेला होता. तसेच, गेल्या दोन दिवसांमध्ये इराणकडून सोडण्यात आलेले 48 ड्रोन्स निकामी केल्याचे प्रतिपादन संयुक्त अरब अमिरातीने केले आहे. या घडामोडी लक्षात घेता इराण शस्त्रसंधीचा भंग करीत आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्या देशावर पुन्हा हल्ले करण्याची वेळ आलेली आहे, असा संदेश डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या वेबसाईटवर दिला.
या संदेशामुळे मध्यपूर्वेतील वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने हल्ला केल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणनेही काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हे युद्ध शस्त्रसंधीपूर्वीच्या युद्धापेक्षाही तीव्र असेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. यामुळे कच्च्या इंधन तेलाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम घडू शकतो. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि तेल पुरवठ्याचे मार्ग मुक्त व्हावेत, अशी जगाची इच्छा आहे.
होर्मुझची परिस्थिती
सध्या होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात शांतता असली, तर तेल वाहतुकीचा मार्ग सुरळीत झालेला नाही. अद्यापही या समुद्रीमार्गात अडथळे आहेत. तरीही काही तेलवाहक नौकांची जा-ये होत आहे. पण प्रमाण पूर्वीपेक्षा बरेच कमी झाले आहे. या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक 80 टक्के घटल्याचे दिसून येत आहे. भारताला गॅसचा पुरवठा करणाऱ्या काही व्यापारी नौका भारतापर्यंत पोहचत असल्याचे दिसते. या समुद्री मार्गाने प्रामुख्याने भारत, चीन आदी देशांना इंधन पुरवठा होतो. भारताने आता पर्यायी मार्ग प्रस्थापित केल्याने भारतात तेलाची टंचाई नाही. मात्र, वाढत्या तेलदराचा प्रश्न आहे. भारत सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल घेत आहे. तसेच काही प्रमाणात कुवेत, व्हेनेझुएला, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडूनही भारत तेल आणि इंधन वायूची आयात करत आहे.