बलुचिस्तानात एकाचवेळी 12 शहरांमध्ये हल्ले
बलुच बंडखोरांचा हाहाकार : 10 पोलीस ठार, 50 हून अधिक दहशतवाद्यांचाही मृत्यू
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने शनिवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात 12 ठिकाणी एकाचवेळी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान 10 सुरक्षा कर्मचारी ठार झाले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत 50 हून अधिक दहशतवादीही ठार झाले. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नुश्की जिह्यातील उपायुक्तांचे अपहरण केले आहे. बीएलएने या कारवाईला ‘ऑपरेशन हेरोफ’ असे नाव दिले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक निवेदन जारी करून या हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचा दावा केला आहे.
बलुचिस्तानमध्ये बलुची बंडखोरांनी खळबळ उडवून दिली आहे. बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरांमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एकाचवेळी हल्ले सुरू करत पोलीस स्थानके आणि सरकारी इमारतींवर ताबा मिळवला. शनिवारी सकाळी बंडखोरांनी क्वेटा, पासनी, मास्टुंग, नुश्की आणि ग्वादर जिह्यात 12 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी हल्ले केल्याचे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात राजधानी क्वेटामध्ये किमान चार पोलीस ठार झाले.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या झायंद गटाने ‘ऑपरेशन हेरोफ’च्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून मोठा हल्ला केला. बंडखोरांनी बलुचिस्तानमध्ये अनेक पोलीस स्थानके ताब्यात घेतली आहेत. बलुचिस्तान बंडखोरांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे मागे पडलेल्या पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या चौक्या पळून जाण्यास भाग पाडले आहे.
राजधानी क्वेट्टा येथे शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका मोठ्या स्फोटाने या हल्ल्यांना सुरुवात झाली, त्यानंतर दोन तास जोरदार गोळीबार आणि अनेक स्फोट झाले. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 10 सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत, तर पाकिस्तान सरकारने 58 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. हे हल्ले पाकिस्तानी सुरक्षा दल, सरकारी सुविधा आणि इतर लक्ष्यांवर करण्यात आले होते.
बलुच बंडखोरांचा शहरांमध्ये धुडगूस
बंडखोरांनी क्वेट्टा व्यतिरिक्त पास्नी, मास्टुंग, नुश्की आणि ग्वादर जिह्यात एकाचवेळी हल्ले सुरू केले. त्यांनी अनेक ठिकाणी बंदुकीचे हल्ले आणि आत्मघाती बॉम्बस्फोट घडवले. स्थानिक पत्रकार सोशल मीडियावर हल्ल्यांबद्दल विविध दावे करत आहेत. सशस्त्र लोकांनी बलुचिस्तानमधील अनेक शहरांचा ताबा घेतला आहे. मास्टुंगमध्ये बंडखोरांनी पोलीस स्थानके आणि लष्करी छावण्या ताब्यात घेतल्या आहेत. सशस्त्र लोकांनी क्वेट्टामधील अनेक भागांचा ताबा घेतला आहे. ग्वादारमध्ये हल्ला झाल्याची नोंद झाली आहे. कलातमध्येही संघर्ष सुरू आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा
बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) ही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला त्याची स्थापना झाल्यानंतर अनेक देशांनी तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचे शोषण केले जात असून बलुच लोकांचे हक्क हिरावून घेतले जात असल्याचा बीएलएचा दावा आहे. ही संघटना पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि सीपीईसी सारख्या चिनी प्रकल्पांना लक्ष्य करत आहे. बीएलए त्यांच्या गनिमी युद्धशैलीसाठी ओळखली जाते. ते डोंगराळ भागात लपून राहतात आणि नंतर लगेच माघार घेतात.