संतिबस्तवाड येथील ‘त्या’ तरुणाच्या घरावर हल्ला
गावात पोलीस बंदोबस्त वाढविला
प्रतिनिधी/ बेळगाव
संतिबस्तवाड येथील एक नर्सिंग विद्यार्थिनी बेपत्ता झाल्यानंतर त्याच गावातील एका घरावर संतप्त जमावाने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. घरावरील हल्ल्यानंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
संतिबस्तवाड येथील राधिका (वय 18 वर्षे 11 महिने) ही तरुणी 19 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. यासंबंधी तिच्या आईने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून त्याच गावातील सद्रुद्दीन या तरुणाबरोबर ती गेली असणार असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. राधिकाच्या मैत्रीणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्थानकापासून ती बेपत्ता झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडीहून ती बेळगावला आलीच नाही. आजरा मार्गे ती कोल्हापूरच्या दिशेने गेली आहे.
या बेपत्ता प्रकरणानंतर तरुणाच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाला आहे. नर्सिंग विद्यार्थिनीच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून वेगवेगळ्या ठिकाणी ही पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांनी दिली आहे. 15 दिवसांनंतरही त्या विद्यार्थिनीचा शोध लागला नाही.