For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म. ए. समितीच्या कार्यकर्त्याच्या घरावर भ्याड हल्ला

11:51 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
म  ए  समितीच्या कार्यकर्त्याच्या घरावर भ्याड हल्ला
Advertisement

25 हून अधिक जणांच्या टोळक्याचे कृत्य : चाकू-लोखंडी रॉडसह दगडफेक : मारहाणीत चौघे जण जखमी

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याच्या घरावर एका टोळक्याने हल्ला केला आहे. शनिवारी मध्यरात्री शहापूर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मी रोड, भारतनगर, शहापूर येथे ही घटना घडली असून मारहाण व दगडफेकीत एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुंदर शांताराम केळवेकर (वय 32), सचिन शांताराम केळवेकर (वय 36), नितीन शांताराम केळवेकर (वय 34), त्यांची आई लक्ष्मी शांताराम केळवेकर (वय 56) सर्व राहणार लक्ष्मी रोड, भारतनगर, शहापूर अशी जखमींची नावे असून सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. दगडफेकीत घराच्या काचा फुटल्या आहेत.

या प्रकरणी सुंदर केळवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीराम ऊर्फ लोण्या पोटे रा. आनंदवाडी, आकाश वाईंगडे, अजय सुगणे दोघेही राहणार वडगाव, शुभम पोटे, रा. आनंदवाडी यांच्यासह टोळक्यातील इतरांवर भादंवि 143, 147, 148, 341, 323, 324, 326, 307, 427, 504, 506, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. हल्ल्यासाठी चाकू, लोखंडी रॉड, मुष्टीचा वापर करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक एक टोळके सचिन केळवेकर यांच्या घरासमोर दाखल झाले. घरात घुसून त्या भावंडांवर हल्ला करण्यात आला. याचवेळी आणखी काही जणांनी घरावर दगडफेक सुरू केली. शनिवारी मध्यरात्री महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याच्या घरावर टोळक्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच रमाकांत कोंडुस्कर, म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील, शुभम शेळके, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, कपिल भोसले, सागर पाटील आदी नेते-कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

Advertisement

पोलीस स्थानकासमोर ठाण

हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीसाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी शहापूर पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले. चंद्रकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, मदन बामणे आदींसह अनेक नेते-कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अटक करा, या मागणीसाठी पोलीस स्थानकासमोर घोषणाबाजी केली. रविवारी सायंकाळपर्यंत अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांनी पलायन केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 25 हून अधिक जणांचे टोळके या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यात सचिनचे तीन दात पडले असून पोलिसांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.