पाकिस्तानच्या अणुगोदामावर ‘सिंदूर’ अभियानावेळी हल्ला ?
ब्रिटीश तज्ञ टॉम कूपर यांचा गौप्यस्फोट
वृत्तसंस्था/ लंडन
‘सिंदूर अभियान’ काळात भारताने पाकिस्तानच्या कैराणा टेकड्यांमधील अण्वस्त्रांच्या गोदामावर क्षेपणास्त्र हल्ला केला, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त युद्धतज्ञ टॉम कूपर यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देत असताना त्यांनी हे प्रतिपादन केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्र गोदामावर भारताने केलेल्या हल्ल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. ते लपविता येण्यासारखे नाहीत. असा हल्ला करून भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे, असे स्पष्ट प्रतिपादनही टॉम कूपर यांनी या मुलाखतीत केले आहे.
या हल्ल्याचे स्पष्ट आणि अनेक पुरावे माझ्याजवळ आहेत. पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ले करण्याचे घृणित कृत्य चालूच ठेवले, तर पाकिस्तानात आम्ही कोणत्याही वेळी आणि कोठेही हल्ला करू शकतो. आम्हाला रोखण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. त्या देशातील कोणतेही स्थान आमच्या हल्ल्यापासून सुरक्षित नाही, हा कठोर संदेश भारताला द्यावयाचा होता. त्यामुळेच भारताने कैराणा टेकड्यांना लक्ष्य केले होते, अशी साधार मांडणी कूपर यांनी केली.
वायूदलाची पत्रकार परिषद
भारताच्या वायूदलाचे उपप्रमुख एअर मार्शल नागेश कपूर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत काही बाबी उल्लेखिलेल्या होत्या. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना लक्ष्य करण्याची भारताची कोणतीही योजना नव्हती. कैराणा टेकड्यांवर हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता, अशी विधाने त्यांनी केली होती. तथापि, कूपर यांच्या म्हणण्यानुसार भारताने हा हल्ला केला आहे, पण ते मान्य करण्यास भारत नकार देत आहे. यासाठी कूपर यांनी ‘सिंदूर अभियान’ होत असताना भारताच्या वायूदलावर फेसबुक पोस्टमधून टीकाही केली होती. या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा भारताने अण्वस्त्रसाठ्यावर हल्ला केल्याचा पुनरुच्चार केला आहे.
पाकिस्तानचे अमेरिकेसमोर लोटांगण
कैराणा टेकड्याही भारताच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहू शकत नाहीत, हे समजताच पाकिस्तानला अमेरिकेसमोर लोटांगण घालावे लागले. भारताचे हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती पाकिस्ताने अमेरिकेला केली. पाकिस्तानने काकुळतीला येऊन केलेली ही कृतीच भारताचा हल्ला किती प्रभावी होता, याचा पुरावा आहे. नंतर पाकिस्तानच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी भारताला हल्ले थांबवून शस्त्रसंधी स्वीकारण्याची विनंती केली, ही विनंतीही भारताच्या हल्ल्यांमध्ये नेमके काय घडले होते, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे, असेही कूपर यांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमधून भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्याला लक्ष्य केले होते, हे सिद्ध होते, अशी स्पष्टोक्ती टॉम कूपर यांनी मुलाखतीत केली आहे.
प्रत्यक्ष पुरावा आहे काय...
आपण भारतावर जो आरोप करीत आहात, त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे काय, असा प्रश्न कूपर यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्यांनी असे अनेक पुरावे आहेत, असे स्पष्ट उत्तर दिले आहे. भारताची क्षेपणास्त्रे कैराणा टेकड्यांच्या दिशेने जात असल्याचे आणि टेकड्यांच्या जवळ पोहचल्याचे व्हिडीओ आहेत. या टेकड्यांच्या जवळ असणाऱ्या पाकिस्तानच्या वायुतळावरील एक रडार भारताच्या क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केल्याचे दर्शविणारा व्हिडीओ आहे. भारताने या रडार्सना हेतुपुरस्सर लक्ष्य बिनविले होते. पाकिस्तानची भारतावर प्रतिहल्ला करण्याची क्षमता नष्ट करणे हा भारताचा उद्देश होता. त्यानंतर भारताने कैराणा टेकड्यांच्या दोन प्रवेशद्वारांवर क्षेपणास्त्र डागली. याच प्रवेशद्वारांमधून अण्वस्त्रांच्या साठ्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तो मार्ग बंद करून पाकिस्तानची अण्वस्त्रे डागण्याची क्षमता निकामी करणे ही भारताची योजना होती. भारताने हे हल्ले अत्यंत दक्षतापूर्वक आणि पूर्वनियोजित पद्धतीने केले होते. त्यांच्या अचूकपणामुळे पाकिस्तानला हालचाल करण्याची संधी मिळाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रतिहल्ला ठरला निष्प्रभ
पाकिस्ताननेही भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारताची वायुसंरक्षण व्यवस्था अत्यंत प्रबळ आणि प्रभावी असल्याने पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक प्रतिहल्ला परतविण्यात भारताला यश आले. त्यामुळे आक्रमण आणि संरक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर भारत सरस ठरला होता. तथापि, पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्याला लक्ष्य करण्यात भारताने फार मोठा धोका पत्करला होता, अशी टिप्पणीही टॉम कूपर यांनी या मुलाखतीत केल्याचे दिसून येत आहे.
भारताचा स्पष्ट विजय
या 88 तासांच्या ‘सिंदूर अभियाना’त भारताने पाकिस्तानवर स्पष्ट विजय मिळविल्याचे दिसून आले. पाकिस्तान भारताच्या या धडाक्याने अवाक् झाला होता. त्यामुळे अखेर त्याला संघर्ष थांबविण्याच्या दृष्टीने हालचाली कराव्या लागल्या. पाकिस्तानची देहबोली पराभूताची होती, असेही प्रतिपादन कूपर यांनी केले आहे.
अण्वस्त्रसाठ्यावरील हल्ल्याचे अनेक पुरावे
ड ‘सिंदूर अभियाना’त पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्यावर हल्ल्याचे स्पष्ट पुरावे
ड आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर भारताने मिळविला विजय
ड पाकिस्तानचा प्रतिहल्ल्याचा प्रयत्न भारताच्या प्रबळ बचावामुळे अयशस्वी