जेडी व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या ओहायो प्रांतात असणाऱ्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती देण्यात आली. हल्ला झाला तेव्हा व्हॉन्स किंवा त्यांचे कुटुंबिय या घरात नव्हते. हल्लेखोनांनी व्हान्स यांच्या घराच्या काचा फोडल्याचे आणि घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले असून या प्रकरणी आतापर्यंत एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर हा एकच आहे की त्याचे सहकारीही आहेत, याचा शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या संशयिताचा परिचय अद्याप उघड करण्यात आलेला नाही. तसेच हल्ला करण्याचा उद्देश काय होता, याचीही माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हल्लेखोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांना यश आले नव्हते, असे पोलिसांचे प्रतिपादन आहे. व्हान्स किंवा त्यांचे कुटुंबिय यांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न होता काय, याचीही चौकशी केली जात आहे. नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीही या हल्ल्यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली. अमेरिकेची गुप्तचर संस्था या घटनेचे अन्वेषण करीत असून आणखी काही काळानंतर या घटनेसंबंधी अधिक माहिती उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले गेले.