अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला
खलिस्तानी समर्थकांची आगळीक : फलकावर भारतविरोधी घोषणा
वृत्तसंस्था/ हेवर्ड
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या हेवर्डमधील विजय शेरावाली मंदिरात खलिस्तान समर्थकांनी भारतविरोधी घोषणा लिहिल्या आहेत. खलिस्तान समर्थकांनी मंदिराच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून आक्षेपार्ह घोषणा लिहिल्या आहेत. तसेच खलिस्तान जिंदाबाद असे नारे भिंतींवर लिहिले गेले आहेत.
हिंदू अमेरिकन फौंडेशनने सोशल मीडियावर या घटनेची छायाचित्रे शेअर केली आहेत. सातत्याने मंदिरांवर होत असलेले हल्ले पाहता परिसरात कॅमेरे लावण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. मंदिर प्रशासनासोबत आम्ही संपर्कात असून अलामेदा पोलीस विभागालाही याप्रकरणाची माहिती देण्यात आली असल्याचे हिंदू अमेरिकन फौंडेशनने म्हटले आहे.
सुमारे 2 आठवड्यांपूर्वी नेवार्कमध्ये स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला होता. तर एक आठवड्यापूर्वी याच क्षेत्रातील दुर्गा मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. मंदिराच्या फलकावर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर भारताच्या दूतावासाने याची निंदा केली होती. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी लवकर कारवाई करावी अशी मागणी केल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले होते.
भारताबाहेर उग्रवाद आणि फुटिरवादी शक्तींना थारा मिळू नये. आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल अशी अपेक्षा असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी नेवार्कमधील मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी म्हटले होते.