बंगालमध्ये शुभेंदु अधिकारींच्या ताफ्यावर हल्ला
वृत्तसंस्था/ कूचबिहार
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते तसेच विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या वाहनताफ्यावर मंगळवारी हल्ला झाला आहे. काही लोकांनी अधिकारी यांच्या वाहनावर दगडफेक केली आहे. अधिकारी हे राज्यातील कूचबिहारमध्ये एका निदर्शन रॅलीचे नेतृत्व करत असताना काही लोकांनी त्यांच्या वाहनताफ्याला लक्ष्य केले आहे.
शुभेंदु अधिकारी यांच्या निदर्शनाच्या प्रत्युत्तरादाखल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी कूचबिहारमध्ये निदर्शने करण्याची योजना आखली होती. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच अधिकारी यांच्या वाहनताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप होत आहे. तर तृणमूल काँग्रेसने स्वत:वरील आरोप फेटाळत भाजप हल्ल्याचे ढोंग करत असल्याचा दावा करत आहे.
हल्ला झाल्यावर अधिकारी यांनी भाजपच्या अन्य नेत्यांसोबत कूचबिहार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जात पोलीस सुरक्षेच्या अकार्यक्षमतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हल्ल्याप्रकरणी तक्रार नेंदविली आहे. कूचबिहार पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर भाजप नेते अधिकारी यांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले आहे. तर खगराबाडी नजीक त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखविण्यात आले. कथित स्वरुपात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात अधिकारी यांच्या ताफ्यातील एका कारचे नुकसान झाले आहे.