For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

खासबागमध्ये अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला

08:04 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासबागमध्ये अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला
Advertisement

झोनल आयुक्तांना धक्काबुक्की : जेसीबीवर दगडफेक करून काचा फोडल्या

Advertisement

खासबाग डबल रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर काही व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. 23 रोजी दुपारी घडली. कारवाईला विरोध करत व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या जेसीबीवर दगडफेक करून काचा फोडल्या. इतकेच नव्हे तर कारवाईचे नेतृत्व करणारे महापालिकेच्या दक्षिण विभागीय कार्यालयातील झोनल आयुक्त अंकित यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्कीही करण्यात आली. घडलेल्या या घटनेमुळे खासबाग परिसरात खळबळ उडाली. घडनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : खासबाग डबल रोडवर दोन्ही बाजूंना काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून केल्या जात होत्या. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी महानगरपालिकेकडे अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी केली होती. वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेचे दक्षिण विभागीय कार्यालयातील झोनल आयुक्त अंकित यांच्या नेतृत्वाखालील पथक शुक्रवारी दुपारी खासबाग डबल रोडवर दाखल झाले. दुकानाबाहेर काढण्यात आलेले झांप स्वत:हून काढून घ्यावेत, अन्यथा त्यावर जेसीबी चालविला जाईल, अशी सूचना तेथील काही व्यापाऱ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. सूचनेनंतर काही मोजक्याच व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरील अतिक्रमण स्वत:हून हटविण्यास सुरुवात केली. ज्या व्यापाऱ्यांनी सूचनेकडे दुर्लक्ष केले त्यांच्या दुकानाबाहेरील अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यात आला. नाथ पै सर्कलपासून संत बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी व्यापाऱ्यांनी एकत्र येत कारवाईला जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण काढून घेण्यास आम्हाला वेळ द्या, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवल्याने यावेळी शाब्दिक चकमक उडाली. अतिक्रमण हटविण्यासाठी काही मोजकेच अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. काही संतप्त व्यापाऱ्यांनी रागाच्या भरात जवळच पडलेले दगड उचलून जेसीबीवर फेकण्यास सुरुवात केली. यावेळी एका जेसीबीच्या पुढील काचा फुटल्या. सुदैवाने चालकाने प्रसंगवधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. त्याचबरोबर झोनल आयुक्त अंकित यांच्या अंगावर काहींनी धावून जात धक्काबुक्की केली. अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला झाल्याचे समजताच शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दगडफेक व अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या काही संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर घटनेची माहिती समजताच महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेचा निषेध करत महापालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर पोलीस स्थानक गाठले. दगडफेक व अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांच्या विरोधात एफआयआर  दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीवर संघटना ठाम होती. याबाबत मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनादेखील माहिती देण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्थानकाच्या आवारात मनपा कर्मचारी, अधिकारी थांबून होते. एफआयआर दाखल करावा की नाही याबाबत विचारविनिमय सुरू होता. कारवाईला विरोध करण्यापर्यंत ठीक होते. पण अधिकाऱ्यांवर हल्ला करणे योग्य नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात येत होते. नगरसेवक रवी साळुंखे, सरकारनियुक्त सदस्य रमेश सोंटक्की हेदेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेवर पडदा पाडून सामोपचाराने वाद मिटविण्यात यावा, अशी भूमिका दोघांनी व्यक्त केली. वारंवार अतिक्रमण हटाव पथकावर हल्ले करण्याचे प्रकार सुरूच आहेत. मात्र आता अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल पोहोचल्याने मनपा कर्मचारी संघटना आक्रमक बनली आहे.

खासबाग परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करण्यासह अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने खासबाग परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. घटनास्थळी जमलेल्या जमावाला पोलिसांनी तेथून हटकले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होणार की नाही हे मात्र पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.