अभिषेक बॅनर्जींवर हल्ला, 5 आरोपींना अटक
व्हिडिओ फुटेजच्या आधारावर कारवाई : पोलिसांनी स्वत: नोंदविला एफआयआर
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. सोनारपूर पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारावर 5 आरोपींना अटक केली तर अनेक अन्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. तृणमूल नेत्याकडून कुठलीच औपचारिक तक्रार न प्राप्त झाल्याने पोलिसांनी स्वत: दखल घेत एफआयआर नोंदविला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून तृणमूल नेत्यांच्या विरोधात जनतेचा आक्रोश दिसून येत आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसेत मारला गेलेला तृणमूल कार्यकर्ता संजू प्रामाणिकच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता अभिषेक बॅनर्जी यांना ही मारहाण झाली आहे.
दुसरीकडे तृणमूल अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी रात्री हल्ल्यानंतरही अभिषेक बॅनर्जी यांना कोलकात्यातील दोन मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये नेण्यात आले होते, परंतु दोन्ही ठिकाणी त्यांना अॅडमिट करण्यास नकार देण्यात आला आणि जखमा गंभीर नसल्याचे कारण देण्यात आले. डॉक्टरांवर राजकीय नेत्यांचा दबाव होता असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत असून यात ममता बॅनर्जी एका रुग्णालयाच्या सीईओसोबत अत्यंत चढ्या आवाजात बोलत असल्याचे दिसून येते.
या घटनाक्रमाचा सर्वात चिंताजनक पैलू म्हणजे एका जखमी रुग्णाच्या उपचारावरून डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर दबाव टाकण्यात आला. जेव्हा मी सत्तेत होते, तेव्हा कधीच राजकीय विरोधकांना अशाप्रकारे लक्ष्य होऊ दिले नाही. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधत अभिषेक यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार करविण्यात येऊ शकतो असा प्रस्ताव दिला आहे.
ममता बॅनर्जी, माजी मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप
-भाजप नेते आणि दक्षिण कोलकात्याच्या पोलीस उपायुक्तांकडून डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनाला धमकीयुक्त फोन येत होते.
-अभिषेक यांची स्थिती गंभीर नव्हती, मग त्यांना इंटेसिव्ह थेरपी यूनिटमध्ये का ठेवले गेले? मग अचानक डिस्चार्ज का देण्यात आला?
-आता अभिषेक यांच्यावर घरातच उपचार होतील, घरातच ऑक्सिजन सिंलिडर आणि अन्य वैद्यकीय उपकरणे लावण्यात आली आहेत.
हा जनतेचा आक्रोश : भाजप
अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत जे घडले ते घडू नको होते. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. मागील 15 वर्षांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या शासनकाळात बंगालच्या जनतेने जो जुलूम झेलला आहे, त्याचाच उद्रेक अशाप्रकारच्या घटनांमधून दिसून येत अ असल्याचा दावा भाजप नेते आणि राज्याचे मंत्री दिलीप घोष यांनी केला आहे.
तृणमूल नेत्याच्या निकटवर्तीयाचा हात
अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले 5 जण तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदार आणि यावेळी उमेदवार राहिलेल्या लवली मैत्रा यांचे निकटवर्तीय आहेत. लवली मैला 2021 च्या विधानसभा निवडणुकीत सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. यावेळी देखील तृणमूल काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती, परंतु भाजपच्या रुपा गांगुली यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. हल्ल्याप्रकरणी तपन मैती, निर्मल्य सेनगुप्ता उर्फ जॉय, काजल दास, देवासिस दत्ता आणि आकाश गायन यांना अटक झाली आहे. निर्मल्य आणि तपन हे तृणमूल नेत्या लवली मैत्रा यांचे निकटवर्तीय आहेत. काजल दास आणि देवासिस दत्ता देखील तृणमूलशी संबंधित आहेत.