For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime News | सांगलीत मध्यरात्रीचा थरार! अष्टविनायकनगरमधील 'त्या' आठव्या गल्लीत नेमकं काय घडलं?

11:19 AM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime news   सांगलीत मध्यरात्रीचा थरार  अष्टविनायकनगरमधील  त्या  आठव्या गल्लीत नेमकं काय घडलं
Advertisement

                         उसने पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला

Advertisement

सांगली : सांगलीत पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार उघडकीस आला आहे. उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून १९ वर्षीय तरुणावर भररस्त्यात चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला.अष्टविनायकनगरमधील आठव्या गल्लीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंभीर जखमी झालेला सूरज राजू कांबळे (रा. गणेश कॉलनी, वारणाली रोड) याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी निहाल रंगारी आणि बिलाल रंगारी या दोघा भावांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही गंगानगर परिसरातील रहिवासी असून त्यांचे चिकन दुकान असल्याची माहिती समोर आली आहे. सूरज कांबळे हा पेव्हिंग ब्लॉकचे काम करतो. त्याने संशयितांकडून काही पैसे उसने घेतले होते.

Advertisement

काल रात्री सूरज हा त्याचा मित्र आर्यनमड्डी याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना अष्टविनायकनगरमधील गल्ली क्रमांक ८ मध्ये रंगारी बंधूंनी त्यांना अडवले. पैशांच्या मागणीवरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू असतानाच वातावरण तापले. यावेळी निहाल रंगारी याने सूरजचे हात पकडून "याला संपवून टाक" अशी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिलाल रंगारीने कमरेला लावलेला चाकू काढून सूरजच्या पोटात वार केला. रक्ताच्या थारोळ्यात सूरज कोसळताच खळबळ उडाली.

हल्ल्यानंतर त्याच्या दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. घटनेनंतर सूरजचा मित्र आर्यन मड्डी पळून गेला. परिसरातील नागरिकांनी जखमी सूरजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप भागवत आणि निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली.

Advertisement
Tags :

.