पाकिस्तानात हल्ला, 16 सैनिक ठार
मशीन गन लुटून दहशतवादी पसार
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी सैन्याच्या चौकीवर हल्ला केला आहे. यात 16 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून 5 जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावरील माकिन येथे ही घटना घडली आहे.
30 हून अधिक दहशतवाद्यांनी सैन्याच्या चौकीवर सुमारे 2 तासांपर्यंत हल्ला केला आहे. यादरम्यान दहशतवाद्यांनी तेथील वायरलेस उपकरणे, दस्तऐवजांसमवेत अनेक गोष्टींना पेटवून दिले. यानंतर सर्व दहशतवाद्यांनी तेथून पोबारा केला आहे. या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची जबाबदारी तहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीने स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांनी सैन्य चौकीवर हल्ला करत स्वत:च्या वरिष्ठ कमांडर्सच्या हौतात्म्याचा सूड उगविल्याचा दावा केला. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी मशीन गन, नाइट व्हिजन तंत्रज्ञाना समवेत अनेक आवश्यक सैन्य उपकरणे लुटून नेली आहेत.
18 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने खैबर पख्तूनख्वा प्रांतात कारवाई करत 11 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता. त्यापूर्वी 25 ऑक्टोबर रोजी डेरा इस्माइल खान भागात टीटीपी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यात 10 पाकिस्तानी सैनिकांना जीव गमवावा लागला होता आणि 8 जखमी झाले होते. हा भाग अफगाणिस्तान सीमेपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे.
जगभरात टीटीपीचा दहशतवादी समुह वेगाने वाढत असून आगामी काळात तो अल कायदासोबत मिळून जागतिक दहशतवादाला बळ देऊ शकतो असा दावा पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधीने सप्टेंबर महिन्यात केला होता.