For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोह माणसाला संसाराच्या चक्रात अडकवतो

06:07 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोह माणसाला संसाराच्या  चक्रात अडकवतो
Advertisement

भगवंत म्हणाले, प्रपंच हेच सर्वस्व असं मानणारे लोक योगमायेने वेढल्या गेलेल्या मला पाहू शकत नाहीत. मला जाणून घेण्याचा जे प्रयत्न करतात ते सोडून इतरांच्यासाठी तो अंधारात असल्यासारखाच असतो. मनुष्य नेहमीच्या डोळ्यांनी ईश्वराच्या सगुण रूपांकडे बघत असतो त्यामुळे त्याला तो त्याच्याप्रमाणेच देहधारी असल्याचा समज होतो. प्रत्यक्षात ईश्वर हा नित्य असून त्याला जन्म-मृत्यू नसल्याने तो अजन्मा आहे. पुढील श्लोकात भगवंत सांगतात, लोक मला जरी ओळखू शकत नसले तरी मी मात्र आत्तापर्यंत जे जे होऊन गेले आणि पुढे होणार आहेत त्या सर्वांना ओळखतो.

Advertisement

झाली जी जी हि होतिल भूते आहेत आज जी । सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती ।।26 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले, त्या सर्वांना मी ओळखतो. एव्हढेच नव्हे तर पुढे कोण कोण होणार आहेत तेही मला माहित आहेत कारण मीच सर्वांची रूपे घेऊन वावरत असतो. संत हे ईश्वराचे मनोगत बरोबर ओळखतात म्हणून प्रत्येकातल्या ईश्वराला पहायला शिका असे ते सांगतात. ज्याप्रमाणे अंधारात पडलेल्या दोरीला लोक साप समजतात पण तिच्यावर उजेड पडला की, ती दोरी आहे हे लक्षात येते त्याप्रमाणे समोर भासणारी प्राणिमात्रे मिथ्या आहेत हे संतांच्या लक्षात आलेले असल्याने ते प्रत्येकात ईश्वर पाहू शकतात. ईश्वर सर्वव्यापी असून अखंड आहे त्यामुळे इतरांना येथे जागा नाही हेच खरे.

Advertisement

भगवंतांनी पुढील श्र्लोकात म्हणतात, संसारात येणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगामुळे माणसाच्या मनात एखाद्याविषयी प्रेम किंवा एखाद्याबद्दल राग अशी परस्परविरोधी परिस्थिती उद्भवत असते त्यामुळे सुखदु:ख ह्या दोन टोकांच्या परिस्थितीच्या मोहात मनुष्य गुरफटून जातो.

राग-द्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व-मोह जो । संसारी सगळी भूते त्याने मोहूनि टाकिली ।।27।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, माणसाच्यामागे संसार लागण्याचे कारण सांगतो. अभिमान व शरीर ह्या दोघांचे एकमेकावर प्रेम बसले. त्यातून त्यांना इच्छा नावाची कन्या झाली. ती मोठी झाल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागले. त्या दोघांना सुखदु:खरूप द्वंदमोह हा पुत्र झाला. त्याच्या अहंकार आजोबाने त्याला वाढविले. तो द्वंदमोह नेहमी धैर्याला व इंद्रियदमनालाही कायम प्रतिकूल असलेल्या आशारूप दुधाने पुष्ट झालेला आहे. माऊलींच्या ह्या अलंकारिक बोलण्याचा सरळ अर्थ असा की, माणसाच्या अंत:करणातील अहंकारामुळे माणसाला निरनिराळ्या इच्छा होत असतात. त्यांच्या पूर्ण होण्यातून तो सुखी होतो आणि अपूर्ण राहिल्या तर दु:खी होऊन त्या पूर्ण होण्याच्या मार्गात जे आड आलेले असतील त्यांचा द्वेष करू लागतो. त्याचे स्वत:च्या शक्तीबद्दल मोठे गैरसमज असल्याने त्याला सभोवतालच्या वस्तूंचा, व्यक्तींचा मोह होतो. त्या मिळवण्यासाठी त्याच्या हातून जी कर्मे घडतात त्यातून निर्माण होणारे पापपुण्य त्याला संसाराच्या चक्रात अडकवते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.