For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News : आटपाडीकरांना पहिल्या निवडणुकीची उत्सुकता, संभाव्य प्रभागरचनेकडे नजरा

03:26 PM May 16, 2025 IST | Snehal Patil
political news   आटपाडीकरांना पहिल्या निवडणुकीची उत्सुकता  संभाव्य प्रभागरचनेकडे नजरा
Advertisement

पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीला आटपाडीकर सामोरे जाणार

Advertisement

By : सूरज मुल्ला

आटपाडी : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आत्ता तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून नगरपंचायतच्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीचा आशावाद उंचावला आहे.

Advertisement

आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर तीन वर्षापूर्वी नगरपंचायतमध्ये झाले. सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या वाढदिनी तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडीमध्ये नगरपंचायतीची घोषणा केली. त्यानंतर २० मे रोजी शासन निर्णयाने अधिसुचना जाहीर झाली.

नगरपंचायत अस्तित्वात यावी, यासाठी आंदोलन करून भारततात्या पाटील यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. आटपाडीसह भिंगेवाडी व मापटेमळा ग्रामपंचायतच्या समावेशाने आटपाडी नगरपंचायत अस्तित्त्वात आली. गत तीन वर्षात नगरपंचायत क्षेत्राचा भरीव विकास करण्यासाठी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात निधी मंजुर करण्यात आला.

त्यांच्या माध्यमातुन शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. विधान परिषदेचे तत्कालिन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातुनही नगरपंचायत क्षेत्रासाठी प्रारंभी निधी देण्यात आला. नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यापासून येथे प्रशासकराज आहे. संभाव्य नगराध्यक्ष, नगरसेवक म्हणून अनेकांनी मागील दिवसात साखरपेरणी करत कामाला गती दिली आहे.

आत्ता सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने नगरपंचायतची निवडणूक चार महिन्यात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अस्तित्वात आल्यापासुन पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीला आटपाडीकर सामोरे जाणार आहेत. त्याच्या प्रभागरचना, सदस्यसंख्यासह संभाव्य निवडणूक वाटचालीसह प्रशासकीय हालचालीबाबत सारेच अनभिज्ञ आहेत. नगरपंचायतची निवडणूक झाल्यास त्याचे स्वरूप कसे असेल? याबाबत तर्कवितर्क लढविले आहेत.

असे असलेतरी संभाव्य निवडणुकांच्या अनुषंगाने नगरपंचायत क्षेत्रात चर्चाना वेग आला आहे. स्थानिक प्रश्नांची सोडवणुक, जनसंपर्क, लोकसेवा आदिंदमध्ये अग्रेसर मंडळी, राजकीय नेते, कार्यकर्ते पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी अंदाज बांधताहेत.

विधानसभा निवडणुकीचा विचार करता आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात शिवसेना पहिल्या क्रमांकावर, देशमुख गट दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे पहायला मिळाले. आत्ता नगरपंचायतच्या निवडणुकीत पक्षीय बेरीज, स्थानिक आघाड्यांसह कशा स्वरूपात निवडणुका होणार? याचे फक्त अंदाज बांधण्याचे काम समर्थकांकडून होत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रलंबीत निवडणुकांबाबतचा आशावाद उंचावला असुन त्यात आत्ता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आल्याने पुढील वाटचाल कशी राहिल, याकडेही नजरा आहेत. असे असलेतरी आटपाडी नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीची उत्सुकता व वाटचालीच्या घडामोडींकडे नजरा लागल्या आहेत

Advertisement
Tags :

.