Sangli Crime | आटपाडी पोलिसांची मोठी कारवाई! कडेगावमधील मंदिर चोरीचा छडा; २८ लाखांच्या मुद्देमालासह ४ जण गजाआड
कडेगाव मंदिर चोरी प्रकरणाचा आटपाडी पोलिसांकडून उलगडा
आटपाडी -आटपाडी पोलिसांनी कडेगांव तालुक्यातील मंदिराची चोरी उजेडात आणत ४ चोरट्यांना जेरबंद केले. मंदिरातील चांदीचे दागिने चोरी करून विक्रीसाठी फिरणाऱ्या चार आरोपींकडून २८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लक्ष्मण आण्णा चोगुले (वय २७), गुंडा कंकण जाधव (वय ३०), परशुराम तिम्मण इटकर (वय ३४) व संतोष दुर्गाप्पा बडार (वय २६, सर्व रा. जत, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आटपाडी पोलिसांना दिघंची गावच्या हद्दीत काही संशयित इसम चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे २८ लाख २२ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. यात चांदीचे कडे, करंडे, पैंजण, तसेच देवाच्या मूर्तीवरील अलंकारांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्याआरोपींमध्ये लक्ष्मण आण्णा चोगुले (वय २७), गुंडू यंकप्पा जेडपे (वय ३०), परशुराम तिम्मण इटकर (वय ३४) व संतोष दुर्गाप्पा बडार (सर्व रा. जत, जि. सांगली) यांचा समावेश आहे. कडेगांव तालुक्यातील खराडे विटा येथील महादेव मंदिरातून ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, डीवायएसपी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक अमोल खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे, अर्जुन बोडखे, सचिन सुर्वे यांनी ही कामगिरी केली.