महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वातावरण काँग्रेसच्या बाजूने : सोनिया गांधी

06:31 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संसदीय पक्षाच्या बैठकीला केले संबोधित : विधानसभा निवडणुकीसाठी दिला विजयाचा फॉर्म्युला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक असल्याचा दावा करण्यात येतो, परंतु मागील काही महिन्यांमध्ये तेथे 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत. अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणाईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना केली आहे. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकरता वातावरण काँग्रेसच्या बाजूने असल्याचे म्हणत आम्ही कुठल्याही अतिआत्मविश्वासात न येता एकजूट होऊन काम करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे.

हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि बिहारमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. तर झारखंड आणि बिहारमध्येही पक्षाने समाधानकारक यश मिळविले आहे. अशा स्थितीत काही राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल अशी अपेक्षा नेतृत्वाला वाटतेय.

काही महिन्यांमध्ये 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेले वातावरण आम्हाला कायम ठेवायचे आहे. आत्मसंतुष्ट किंवा अतिआत्मविश्वासी होणे आम्ही टाळले पाहिजे. वातावरण आमच्या बाजूने आहे. परंतु आम्हाला विजयाच्या भावनेसह एकजूट होत काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीतील कल पाहून चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल घडेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नसल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.

वायनाडच्या पीडितांबद्दल संवेदना

संसदीय पक्षाच्या बैठकीत वायनाड भूस्खलन पीडितांबद्दल संवेदना व्यक्त करण्यात आली. वायनाडमध्ये आलेल्या भीषण आपत्तीमुळे पीडित परिवारांबद्दल आम्ही तीव्र संवेदना व्यक्त करतो. राज्यात आमच्या सहकाऱ्यांकडून लोकांना मदत केली जात आहे. देशाच्या अन्य हिस्स्यांमध्ये देखील पूर आला आहे. आम्ही प्रभावित परिवारांबद्दल संवेदना व्यक्त करतो. खराब व्यवस्थापनामुळे  रेल्वे दुर्घटनांमध्ये आमचे लोक जीव गमावत असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

देशात महागाई-बेरोजगारीची समस्या

अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या बाबतीत न्याय झालेला नाही. देशभरात कोट्यावधी परिवार वाढती बेरोजगारी आणि महागाईने उद्ध्वस्त झाले आहेत अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. तर दुसरीकडे मागील काही आठवड्यांमध्ये केवळ जम्मू क्षेत्रातच 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत. काश्मीर खोऱ्यातही अशाप्रकारचे हल्ले झाले आहेत. जवान आणि मोठ्या संख्येत नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचा मोदी सरकारचा दावा यामुळे खोटा ठरत आहे. मणिपूरच्या स्थितीत सुधाराचे संकेत दिसून येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण जगाचा प्रवास करत आहेत, परंतु मणिपूरचा दौरा करणे आणि तेथील स्थिती सामान्य करण्याचा पुढाकार घेण्यास नकार देत असल्याचा आरोप सोनिया गांधी यानी केला.

जनगणना करविण्यास टाळाटाळ

सोनिया गांधी यांनी जनगणना न झाल्याप्रकरणीही केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. जनगणना करविण्याचा सरकारचा कुठलाच उद्देश नसल्याचे स्पष्ट आहे. जनगणना 2021 पासून प्रलंबित अताहे. यामुळे आम्हाला देशाची लोकसंख्या, विशेषकरून अनुसूचित जाती आणि  अनुसूचित जमातीच्या संख्येविषयी कळणे अवघड ठरले आहे. याचमुळे कमीतकमी 12 कोटी नागरिक पीएम गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा सोनिया यांनी केला.

संघाचाही उल्लेख

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्यापासून धडा मोदी सरकार घेईल अशी आम्हाला आशा होती. परंतु याऐवजी समुदायांना विभागणे, घाबरविणे आणि शत्रुत्वाचे वातावरण फैलावण्याच्या धोरणावर सरकार कायम आहे. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने योग्यवेळी हस्तक्षेप केला. शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची अनुमती देण्याच्या नियमांना अचानक बदलण्यात आले. संघ हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार असल्याचे पूर्ण जग ओळखून आहे. मागील काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. देशाला पुढे नेण्याऐवजी शिक्षणव्यवस्था दोषपूर्ण राबविली जात आहे. पेपर लीक झाल्याने लाखो युवांचा विश्वास उडाला आहे. एनसीईआरटी, युजीसी, युपीएससी यासारख्या घटनात्मक संस्थांची स्वायत्तता पूर्णपणे नष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article