दिल्लीत ‘आतिशी’ सरकार
सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान : पाच मंत्र्यांनीही घेतली शपथ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आतिशी मार्लेना यांनी शनिवारी दिल्लीच्या 17 व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज निवास येथे उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांना पदस्पर्श केला. त्या दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहे. त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दोघांना दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता.
आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हा एकमेव नवा चेहरा आहे. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता दिल्लीत ‘आतिशी’ यांच्या नेतृत्त्वातील आम आदमी पार्टीचे सरकार कार्यभार हाताळणार आहे. 17 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आप आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांचे नाव निश्चित केले होते. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
केजरीवाल यांचे मानले आभार
मुख्यमंत्री झाल्यानंतर आतिशी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत. दिल्लीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, माझा मोठा भाऊ आणि माझे राजकीय गुरू अरविंद केजरीवाल यांचे मला आभार मानायचे आहेत. त्यांनी दिल्लीच्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. आज मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री नसणे हा माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी भावनिक क्षण असल्याचे त्या म्हणाल्या.
आम आदमी पक्षाच्या खंबीर नेत्या
43 वषीय आतिशी कालकाजी मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मोडला आहे. केजरीवाल 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते 45 वर्षांचे होते. तर आतिशी सध्या 43 वर्षांच्या आहेत. मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया तुरुगात असतानाही आतिशी यांनी पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 2013 च्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’चा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीच्या त्या प्रमुख सदस्य होत्या. तेव्हापासून त्या पक्षाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मंत्रिमंडळातील अन्य सहकारी
आतिशी यांच्या नेतृत्त्वातील मंत्रिमंडळात सौरभ भारद्वाज यांचाही सहभाग आहे. ते 2013 पासून आमदार आणि मंत्री आहेत. केजरीवाल यांचे ते विश्वासू नेते आहेत. तसेच ज्येष्ठ नेते गोपाल राय यांचे स्थानही अबाधित आहे. सध्याच्या दिल्ली सरकारमध्ये ते पर्यावरण मंत्री आहेत. त्यांना मंत्रीपदे भूषवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. अन्य एक मंत्री कैलाश गेहलोत हे जाट कुटुंबातील असून 2017 पासून ते सतत परिवहन मंत्रालयाची धुरा सांभाळत आहेत. इम्रान हुसैन हा मंत्रिमंडळातील मुस्लीम चेहरा आहे. दिल्लीत 11.7 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. पक्षाला 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतपेढीवर पकड कायम ठेवायची असल्याने त्यांचेही मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे.
मुकेश अहलावत नवीन चेहरा
दलित समुदायातून आलेले मुकेश अहलावत यांना आतिशी यांच्या मंत्रिमंडळात नव्याने सामावून घेण्यात आले आहे. दलित समाजातून आलेले मुकेश अहलावत हे राजकुमार आनंद यांची जागा घेतील. दिल्लीत 12 टक्के दलित लोकसंख्या आहे. राजकुमार आनंद यांनी अन्य पक्षात प्रवेश केल्याने आपच्या दलित व्होटबँकेला तडा गेला आहे. पक्षाला प्रथमच आमदार अहलावत यांना मंत्री करून दलित व्होट बँक जोपासायचा प्रयत्न केला आहे.
केजरीवाल यांची आज जंतर-मंतरवर ‘अदालत’
आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज 22 सप्टेंबर रोजी जंतर-मंतर येथे ‘जनता की अदालत’ कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केजरीवालांची ‘जनता की अदालत’ होत आहे. या सभेमध्ये केजरीवाल काय बोलतात याकडे आप कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या 74 व्या वाढदिवसापूर्वी केजरीवाल यांच्या राजीनाम्यापूर्वी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अतिशी यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. यानंतर संध्याकाळी 5 वाजता केजरीवाल यांनी उपराज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आतिशी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता.