अॅथलिड गोवा चॅलेंजर्सचे सलग दुसरे जेतेपद
वृत्तसंस्था/ चेन्नई
हरमीत देसाई आणि चीनच्या लियु यांच्या नेतृत्वाखाली अॅथलिड गोवा चॅलेंजर्स संघाने सलग दुसऱ्यांदा अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अॅथलिड गोवा चॅलेंजर्सने 2018 सालातील विजेत्या दबंग दिल्लीचा 8-2 अशा फरकाने पराभव करत जेतेपद पुन्हा सलग दुसऱ्यांदा स्वत:कडे राखले.
येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत अॅथलिड गोवा चॅलेंजर्सने 2018 सालातील या स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या दबंग दिल्लीचा 8-2 अशा फरकाने पराभव केला. अॅथलिड गोवा चॅलेंजर्स आणि दबंग दिल्ली यांच्याकडून कडवी लढत पहावयास मिळाली नाही. हा अंतिम सामना एकतर्फी झाला. अॅथलिड गोवा चॅलेंजर्स संघातील हरमीत आणि यांग झी यांनी एकेरीचे स्वत:चे सामने जिंकले. या सामन्यात हरमीत देसाईला सर्वोत्तम भारतीय टेबल टेनिसपटू म्हणून घोषित करण्यात आले. तर चीनच्या यांग झी याची या स्पर्धेत सर्वोत्तम विदेशी स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या अंतिम लढतीमध्ये एकेरीच्या सामन्यात हरमीत देसाईने अॅथलिड गोवा चॅलेंजर्स संघाला विजय मिळवून देताना दिल्ली दबंगच्या जी. साथियानचा 6-11, 11-9, 11-6 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात अॅथलिड गोवा चॅलेंजर संघाची आघाडी वाढवली. यांग झीने विद्यमान विजेत्या पेरांगचा 6-11, 11-9, 11-6 असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात अॅथलिड गोवा चॅलेंजर्स संघातील हरमीत देसाई व यांग झी यांनी दबंग दिल्लीच्या ओरेवान आणि साथियान यांचा 9-11, 11-8, 11-9 असा पराभव केला.