अॅथलेटोन-सीई पॉवर रंगरेज अंतिम फेरीत
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णावर चषक 12 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यातून अॅथलेटोन संघाने लेकव्ह्यु टायटन्सचा तर सीई पॉवर रंगरेजने जीवामित्र संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयुष खोडे व श्लोक चडीचाल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात लेकव्ह्यु टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 86 धावा केल्या. श्रेयस पाटीलने 3 चौकारासह 35, अरहान राजमानेने 13 तर अर्णव चन्नालीने 11 धावा केल्या. अॅथलेटोनतर्फे श्लोक चडीचाल व आरुष जंगी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अॅथलेटोन संघाने 14.4 षटकात 1 गडी बाद 87 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात श्लोक चडीचालने 9 चौकारासह 54, अथर्व होनगलने 2 चौकारासह नाबाद 19 धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जीवामित्र वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 113 धावा केल्या. त्यात स्वराज्य गोवेकरने 3 चौकारासह 23, आरुष पाटीलने 16, हमदन हुबलीवालेने 15 तर जीवा गौडरने 14 धावा केल्या. सीई पॉवर रंगरेजने आयुष खोडेने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीई पॉवर रंगरेज संघाने 16.3 षटकात 3 गडी बाद 114 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. शिवनेश यळ्ळूरकरने 5 चौकारासह नाबाद 41, मोहीत कुंभारने 5 चौकारासह 32 धावा केल्या. जिवामित्र वॉरियर्सतर्फे प्रणव बेल्लदने 2 गडी बाद केले. अंतिम सामना रविवार दि. 8 रोजी सकाळी 10 वाजता अॅथलेटोन व सीई पॉवर रंगरेज यांच्यात होणार आहे.