For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28खेळाडूंचा अॅथलेटिक संघ

06:25 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पॅरिस ऑलिम्पिकसाठी  28खेळाडूंचा अॅथलेटिक संघ
Advertisement

नीरज चोप्राकडे नेतृत्वाची धुरा : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचाही सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/   नवी दिल्ली

भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी नीरज चोप्रासोबत किशोर जेनाही भाला फेकताना दिसणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय अॅथलेटिक्स संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement

टोकियो ऑलिंपिकमधील 8 खेळाडू

नीरज चोप्रा आणि अन्नू राणी यांच्यासह पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस अॅथलिट अविनाश साबळे, गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर, महिला रेस वॉकर प्रियांका गोस्वामी आणि 4×400 मीटर रिले धावपटू मोहम्मद अनस, अमोज जॅकब आणि सुभा व्यंकटेशन टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. मोहम्मद अनस हा भारतीय पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाचा भाग आहे आणि तो सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

धावपटू पारुल चौधरी 3000 मीटर स्टीपलचेस आणि 5000 मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. दोन वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी निवडलेली ती एकमेव खेळाडू आहे. गेल्या वर्षी तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक तर 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावले होते. यंदाही तिच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान, ट्रॅक आणि फिल्ड प्रकार स्टेड डी फ्रान्स स्टेडीयममध्ये 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. अॅथलेटिक्स प्रकारामध्ये यावेळी नव्याने मॅरेथॉन रेस, चालणे मिश्र रिले या नव्या प्रकाराचा समावेश आहे. ऑलिंपिक स्पर्धा कार्यक्रमातून यावेळी मात्र पुरूषांच्या 50 कि.मी. चालण्याचा प्रकार वगळण्यात आला आहे.

भारतीय अॅथलेटिक संघ

पुरुष - अविनाश साबळे (3000 मी. स्टीपलचेस), नीरज चोप्रा, किशोरकुमार जेना (भालाफेक), तेजिंदरपालसिंग तूर (गोळाफेक), प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबाकर (तिहेरी उडी), अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजितसिंग बिस्त (20 कि.मी. चालणे), मोहम्मद अनास, मोहम्मद अजमल, अमोल जेकॉब, संतोष तामिलरेसन, राजेश रमेश (4×400 मी. रिले), मिजो चाको कुरियन (4×400 मी. रिले), सुरज पनवर (चालण्याची मिश्र मॅरेथॉन).

महिला : किरण पहल (400 मी. धावणे), पारुल चौधरी (3000 मी. व 5000 मी. स्टीपलचेस), ज्योती याराजी (100 मी. अडथळा शर्यत), अन्नु राणी (भालाफेक), आबा खातुआ (गोळाफेक), ज्योतिका श्री दंडी, शुभा व्यंकटेशन, वित्या रामराज, एम. आर. पूवम्मा (4×400 मी. रिले), प्राची (4×400 मी. रिले), प्रियांका गोस्वामी (20 कि.मी. चालणे मिश्र मॅरेथॉन).

पंतप्रधान मोदींच्या भारतीय चमूला शुभेच्छा

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिकसाठी 120 खेळाडूंच पथक पाठवण्यात येणार आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या पथकाची भेट घेतली. यावेळी त्यांनी खेळाडूंशी विविध विषयावर चर्चा केली.पंतप्रधान मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना भेटून माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असतो, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या स्पर्धेत तुम्ही भारताच नाव उज्वल कराल, हा आम्हाला विश्वास आहे, असे सांगत त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.