अॅथरचा येणार आयपीओ, हालचाली वाढल्या
ओला इलेक्ट्रीकनंतर दुसरी इलेक्ट्रीक कंपनी बनणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रातील कंपनी अॅथर एनर्जी यांचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी पुढील महिन्यात अर्थात एप्रिलमध्येच आपला आयपीओ लाँच करण्याची शक्यता सांगितली जात आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 8 मार्च रोजी एका प्रस्तावाला मान्यता दिली आहे ज्यात 1.73 कोटीहून प्रेफरेन्स शेयर्स इक्विटी समभागांमध्ये रुपांतरीत करण्याला मंजुरी दिली गेली आहे.
सेबीकडे आयपीओकरीता अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व प्रेफरन्स शेयर्स इक्विटीत रुपांतरीत करायचे असतात. आता हे पाऊल कंपनीने उचलले असल्याने आयपीओ सादरीकरण प्रक्रियेला वेग येणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मधील पहिला आयपीओ सादर करण्यासाठी अॅथर एनर्जी कंपनी अधिक उत्सुक असल्याचे समजते.
दुसरी इलेक्ट्रीक वाहन कंपनी
महाराष्ट्रात इलेक्ट्रीक दुचाकी प्लांट उभारणीसोबत कर्ज कमी करण्यासाठी निधी उभारण्यासाठी कंपनीने आयपीओची योजना आखली होती. 3100 कोटी रुपयांचे ताजे समभाग आयपीओअंतर्गत सादर केले जाऊ शकतात, असेही सांगितले जात आहे. यातही पुन्हा प्रवर्तक आणि गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलअंतर्गत 22 दशलक्ष इक्विटी समभाग विकू शकतात. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ओला इलेक्ट्रीकने 6145 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता, त्यानंतर अॅथर दुसऱ्या नंबरची कंपनी असेल.