अॅथरची नवी इलेक्ट्रिक 450 अपेक्स स्कूटर लॉन्च
मायलेज 157 किलोमीटर देणार: 1.89 लाख रुपये किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅथर एनर्जीने आपली नवी 450 अपेक्स ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारामध्ये लॉन्च केली आहे. बेंगळूरच्या या इलेक्ट्रिक कंपनीने सदरची दुचाकी ही ट्रान्सपरंट बॉडीने युक्त असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची ही दुचाकी जगातील पहिलीवहिली असल्याचा कंपनी दावा करते आहे.
सदरच्या दुचाकीची किंमत 1.89 लाख रुपये इतकी असणार असून या इ स्कूटरचे बुकिंग 19 डिसेंबरपासून सुरू झालेले आहे. 2500 रुपये टोकन रक्कम भरून ही गाडी ग्राहकांना बुक करता येते. सदरच्या दुचाकीचे मायलेज हे 157 किलोमीटर असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला असून ही गाडी ओला कंपनीच्या एस 1 प्रो या गाडीला टक्कर देणार आहे. कंपनीने सदरच्या गाडीकरिता पाच वर्षाची बॅटरी वॉरंटी दिली आहे.
कधी होणार डिलिव्हरी
गाडीच्या वितरण प्रक्रियेला मार्च 2024 मध्ये सुरुवात होणार आहे. अपेक्स 450 ही दुचाकी उत्तम कार्यक्षमतेसह असून चालवण्यासाठी आरामदायी असल्याचाही दावा केला जात आहे. या गाडीमध्ये 7.0 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. सदरची बॅटरी चार्ज होण्याकरिता जवळपास पाच तास 45 मिनिटांचा अवधी लागतो.
आधुनिक फिचर्स
हिल होल्ड असिस्ट, पार्क असिस्ट, जीपीएस नेव्हिगेशन, राइड मोड्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि लाइव्ह ट्रेकिंग यासारख्या आधुनिक सुविधा या गाडीमध्ये दिल्या जाणार आहेत.