अॅथर एनर्जीने आयपीओ प्रक्रियेला दिला वेग
3000 कोटी रुपये उभारणार : मेमध्ये समभाग बाजारात सुचीबद्ध होणार
वृत्तसंस्था/मुंबई
इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माती कंपनी अॅथर एनर्जी यांनी आयपीओ आणण्यासाठी नव्याने कागदपत्रे सादर करण्याचे ठरवले आहे. याचदरम्यान आयपीओचा आकार कंपनीने घटवला असून नव्या अर्जानुसार कंपनी आयपोच्या माध्यमातून 3000 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती समोर येते आहे.
मे महिन्यात समभाग सुचीबद्ध
आधी कंपनी आयपीओ अंतर्गत 4 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना बनवत होती. पण आता धोरण कंपनीने सध्याची परिस्थिती पाहून बदलणे योग्य मानले आहे. दरम्यान आयपीओ अर्ज केल्यानंतर कंपनीचे समभाग मे महिन्यामध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होत असल्याकारणाने अॅथर एनर्जीने आयपीओचा आकार कमी केला आहे. आयपीओ सादरीकरण संदर्भातील कागदपत्रे कंपनीकडून बाजारातील नियामक सेबीकडे लवकरच सुपूर्द केली जाणार आहेत.
मार्चमध्ये एकही आयपीओ नाही
जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च आणि एप्रिलमध्ये कोणताही नवा आयपीओ बाजारात दाखल झालेला नाही. याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये सहा कंपन्यांचे आयपीओ बाजारामध्ये दाखल झाले होते. सदरच्या कंपन्यांनी जवळपास 4,845 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. अॅथर एनर्जीने आता पुन्हा एकदा आयपीओ सादरीकरणाची गडबड सुरू केली असून कर्ज उचलण्याऐवजी आयपीओच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्याची योजना कंपनीने बनवली आहे.
कशासाठी आयपीओ आणण्याची गडबड
आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेली रक्कम पाहता यापैकी बरीचशी रक्कम ही महाराष्ट्रातील संभाजीनगरमधील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कारखान्यासाठी वापरली जाणार असल्याचे समजते. सदरचा प्रकल्प हा दोन टप्प्यांमध्ये होणार असून त्याकरता 927 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. 2027 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.