अॅथर 450 अॅपेक्सचे बुकिंग सुरु
कंपनीची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आगामी वर्षात होणार सादर
नवी दिल्ली :
इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माती कंपनी अॅथर एनर्जीने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर ‘450 अॅपेक्स’ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये 2,500 रुपये आगाऊ रक्कम भरुन ग्राहकांना आपले वाहन बुक करण्याची सुविधा असेल. यावरून असे मानले जात आहे की कंपनी लवकरच भारतीय बाजारात ई-स्कूटर लाँच करू शकते. या स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
नवीन 450 अॅपेक्सचे टीझर
यासोबतच कंपनीकडून ई-स्कूटरचा आणखी एक टीझरही सादर करण्यात आला आहे. स्कूटरची रचना आणि एकंदर गाडीचा आकार यामध्ये दिसत आहे. ही कंपनीची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर राहणार असल्याचा दावा कंपनीने या दरम्यान केला आहे. या ईव्हीमध्ये अन्य अॅथर मॉडेल्सपेक्षा अधिक रेंज असेल अशी अपेक्षा आहे. सदरची नवीन ई-स्कूटर ओला ए1 व प्रो यांच्या सोबत स्पर्धा करणार आहे.
अॅथर एनर्जीची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर
अॅथर एनर्जीचे हे सर्वात वेगवान स्कूटर मॉडेल असेल असा दावा केला जात आहे. स्पीड वाढवण्यासाठी कंपनीने 450अॅपेक्समध्ये अनेक बदल केले आहेत. विशेषत: त्याच्या हार्डवेअरमध्ये बदल दिसून येतील. याशिवाय स्कूटरचे अनेक सॉफ्टवेअर्सही अपग्रेड केले जाऊ शकतात.