अटलजी हे जगाचे प्रेरणास्थान!
गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक यांचे प्रतिपादन : पणजीतील अटल सेतू परिसरात वाहिली आदरांजली
प्रतिनिधी/ पणजी
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या योगदानासाठी आणि देशसेवेसाठी जो आदर्श घालून दिला त्याला तोड नाही. त्यांनी सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाला वेगळी दिशा दिली. त्यांचे त्याग आणि आत्मसमर्पण हे फार मोठे आहे. त्यामुळे ते केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे प्रेरणास्थान अजूनही आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्गार काढले.
पणजीतील अटल सेतू परिसरात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त त्यांना काल गुऊवारी आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक व कार्यकर्ते उपस्थित होते.
अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी देशाचे नेतृत्व कशापद्धतीचे असावे, यासाठी प्रस्थापित राजकारण्यांना धडे दिले. संसदेत त्यांनी देशहितासाठी दिलेले सल्ले आजही विकासाच्या कार्यात मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडत आहेत. राजकारण, समाजकारण आणि सेवा यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे, अशा शब्दांत खासदार तानावडे यांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.
अटल सेतू परिसरात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच फुले वाहून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.