महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पहिल्याच वळिवाने नाले कचऱ्याने तुडुंब

06:35 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कचरा काढण्यासाठी मनपाची धावपळ : पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाले साफ केले तरच समस्या मिटणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

पाऊस येताच साऱ्यांना आठवण येते ती शहरातील नाल्यांची. मात्र या नाल्यांची अवस्था पाहता शहराला एक दिवस मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी प्लास्टिक विरोधात कारवाईची मोहीम राबविली तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे नाल्यामध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यावरून उघडकीस आले आहे. लेंडी आणि बळ्ळारी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने महानगरपालिकेने शनिवारी कचरा काढण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी झालेल्या वळिवाने शहरातील विविध ठिकाणी टाकलेला प्लास्टिकचा कचरा लेंडीनाला, बळ्ळारी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचून राहिला आहे. यामुळे आता महानगरपालिकेने व बेळगावच्या समस्त जनतेने सावध होण्याची गरज निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पावसाळ्यापूर्वीच या नाल्यांची पूर्णपणे सफाई होणे गरजेचे होते. मात्र दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेला जाग येते. परिणामी त्याचा शहरवासियांना फटका बसत आहे.

शहरातील सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी लेंडीनाला, बळ्ळारी नाला याचबरोबर इतर लहान नाले आहेत. मात्र या नाल्यांची अवस्था पाहता भविष्यात शहराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे या नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि गाळ पाहता शहराला मोठी धोक्याची घंटाच आहे. हे पाहून खडबडून जागे झालेल्या महानगरपालिकेने हा कचरा काढण्यासाठी शनिवारी धावाधाव केली. त्यामधील गाळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण गाळ काढणे अशक्यच झाले आहे.

लेंडीनाला हा बळ्ळारी नाल्याला जावून मिळतो. मात्र बळ्ळारी नाल्याची खोदाई झाली नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे. परिणामी शहराला पुराचा धोका आहे. शिवारामध्ये असलेल्या बळ्ळारी नाल्याचीही खोदाई होणे गरजेचे आहे. या सर्व नाल्यांमध्ये झाडे, जलपर्णी वाढल्याने कचरा अडकून पाणी साचून राहत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान या नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. याचबरोबर त्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरादेखील फेकण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होणार असून या नाल्यांतील गाळ काढण्याबरोबरच अतिक्रमणही हटविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

कचरा काढण्यासाठी दोन जेसीबी

महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शनिवारी कचरा काढण्यासाठी दोन जेसीबींची व्यवस्था केली. शिवाजी रोड येथील व कपिलेश्वर कॉलनी येथील नाल्यामध्ये कचरा काढण्यासाठी दोन जेसीबी पाठविण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेतील कचरा वाहतूक विभागाचे प्रमुख महावीर लाखे यांनी दिली.

पुलावरील संरक्षक कठड्याची दुरवस्था

जुन्या धारवाड रोडवर असलेल्या लेंडीनाल्यावर पूल बांधण्यात आला. त्या पुलाला संरक्षक कठडा बांधण्यात आला आहे. मात्र तो कठडा काही वर्षांतच कोसळला असून त्यामधील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. निकृष्टदर्जाचे काम करण्यात आले आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, तसेच नव्याने संरक्षक कठडा बांधावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article