शेवटच्या क्षणी शेअरबाजार तेजीसोबत बंद
सेन्सेक्स 272 अंकांनी वधारला, रिलायन्स तेजीत
मुंबई :
आशियाई बाजारात घसरणीमुळे बुधवारी दिवसभरात चढ-उतारानंतर अखेर भारतीय शेअरबाजार तेजीसोबत बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 271 अंकांनी तर निफ्टी 73 अंकांनी वधारत बंद झाला. रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक यांच्या कामगिरीचा फायदा शेअरबाजाराला झाला.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 271 अंकांनी वधारत 71,657 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकही 73 अंकांनी वधारत 21,618 अंकांवर बंद झाला आहे. शेअरबाजारात बुधवारी दिवसभराच्या सत्रात चढ-उतार पाहायला मिळाला. रियल्टी निर्देशांक 1 टक्का घसरत बंद झाला होता. दिवसभरात सुस्त असलेल्या शेअरबाजारात शेवटच्या सत्रात तेजी आलेली दिसली.
निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप व निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकदेखील तेजी दाखवत बंद झाला होता. बुधवारी शेअरबाजारात सिप्ला, अदानी एंटरप्रायझेस, एचसीएल टेक आणि अदानी पोर्टस यांचे समभाग हे सर्वाधिक तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले आहेत. शेअरबाजारात कोचीन शिपयार्डचे समभाग मंगळवारी दोन हिस्स्यामध्ये विभाजीत झाले असून बुधवारी या समभागात जोरदार तेजी दिसली आहे. दुसरीकडे ओएनजीसी, डिव्हीस लॅब्ज, एनटीपीसी आणि बीपीसीएल यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते. उद्योगपती गौतम अदानी समूहातील 10 लिस्टेड कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे समभाग तेजीत दिसून आले. मल्टीबॅगर कंपन्यांच्या समभागात पाहता अशनिशा इंडस्ट्रिज, गार्डनरीच शिपबिल्डर, रिलायन्स इंडस्ट्रिज, आयआरसीटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एसबीआय कार्ड, एचडीएफसी बँक, फेडरल बँक आणि देवयानी इंटरनॅशनल यांचे समभाग तेजीत होते. मारुती सुझुकी, मुथूट फायनान्स, इन्फोसिस, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, पतंजली फूडस आणि गरवारे टेक्नीकल फायबर्स यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते.