सुळगा (हिं.) येथे श्री दुर्गामाता दौडला सुरुवात
सुळगा (हिं.) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देश आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडला गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून सुऊवात झाली आहे. गुरुवारी सकाळी 5.45 वा. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लक्ष्मी गल्ली येथून दौडीची सुरूवात झाली. तत्पूर्वी ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र, गणेश, दुर्गामाता आणि छत्रपती शिवरायांची आरती म्हणून पहिल्या दिवशीच्या दौडला चालना देण्यात आली. गावातील विठ्ठल मंदिरनजीक विठ्ठल-ऊक्मिणी भजनी मंडळाच्यावतीने दौडचे स्वागत करण्यात आले. यावेळी गल्लोगल्ली सुहासिनींनी आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले. दौडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या बालचमू आणि युवा वर्गाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दौडमधील धारकऱ्यांनी श्लोक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करत परिसर दणाणून सोडला होता. या दौडीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं.) विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्यासह गावातील प्रमुख धारकरी, युवक-युवती, यांच्यासह बाळगोपाळ सहभागी झाले होते.