केंद्र सरकारने तरी न्याय द्यावा
कारापूरवासियांची लोढा-सरकारच्या विरोधात दिल्लीत निदर्शने
त. भा. प्रतिनिधी
पणजी : कारापूर - सर्वण येथील ग्रामस्थांनी लोढा प्रकल्पाच्या विरोधात चालू केलेल्या आंदोलनास 100 दिवस पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर धडक मारुन जोरदार निदर्शने केली आणि दिल्लीत आवाज उठवला. गोवा राज्य सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने आता केंद्र सरकारने तरी आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली.
आप तसेच काँग्रेस पक्षाने नवी दिल्ली येथील सदर आंदोलनास पाठिंबा दर्शवला असून अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनीही समर्थन दिले आहे. ते सर्व आंदोलनात सामील झाले होते.
लोढा प्रकल्पामुळे कारापूर - सर्वण या दोन्ही गावांवर संकट कोसळले असून 100 दिवस आवाज उठवून देखील राज्य सरकार त्याची साधी दखल घेत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकार ऐकत नाही, ते बहिरे, आंधळे झाले असून लोढा प्रकल्पाची गोव्याला आणि आमच्या गावासाठी गरज नाही, अशा शब्दात तेथे ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे महिलावर्गाने देखील आंदोलनात भाग घेतला.
काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस, गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुनिल कवठणकर, आपचे गोवा प्रदेश अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी आंदोलनात भाग घेऊन ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला. या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या जमिनीची विक्री आणि मिळालेले परवाने हे संशयास्पद असून त्यांची वैधता तपासण्याची गरज आहे. ग्रामस्थांना नको असताना तो लादला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या प्रकल्पाची चौकशी करावी, अशी मागणी तेथे आंदोलकांनी केली.
भाजप गावे नष्ट करीत आहे : फर्नांडिस
खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले की, गोवा राज्याची अस्मिता, ओळख, वेगळेपण नष्ट करण्याचेच भाजपने ठरविले असून रियल इस्टेट उद्योजकांना गोवा आंदण म्हणून देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला असून ते गोव्यात येऊन इथली गावे नष्ट करीत आहेत, अशी टीका फर्नांडिस यांनी केली.
भाजपच्या पराभवाची नांदी गोव्यातूनच : कवठणकर
एवढे दिवस आंदोलन चालू असताना ते गोवा सरकारला दिसत नाही. त्यामुळे हे सरकार आंधळे झाले असून ते आता लवकरच पांगळे होण्यास वेळ लागणार नाही. गोवा राज्यातून भाजपच्या विजयाचा शुभारंभ झाला होता आता पराभवाची नांदी गोव्यातूनच सुरु होणार असल्याचे सुनिल कवठणकर यांनी बोलताना नमूद केले. नाईक यांनी देखील भाजपवर हल्लाबोल करुन जोरदार टीका करताना आंदोलनास पाठिंबा वर्तवला.
जंतरमंतर येथे दिवसभर हे आंदोलन झाले. भाजप, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे आणि एकंदरित सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वप्नील सालेलकर, अजय प्रभुगांवकर व स्वप्नेश शेर्लेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.