मंत्री राणे यांच्याकडून किमान आरोग्यखाते तरी काढून घ्या
आरजीचे मनोज परब यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
पणजी : गोमेकॉतील एका वरिष्ठ डॉक्टरला अत्यंत अशोभनीय पद्धतीने अपमानास्पद वागणूक देण्याच्या प्रकारामुळे वादग्रस्त ठरलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना मंत्रिमंडळातून वगळणे शक्य होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी किमान त्यांच्याकडील आरोग्यखाते तरी काढून घ्यावे, असे आवाहन आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केले आहे. तरीही मुख्यमंत्री त्यांना पाठिशी घालत असतील तर आम्ही पुढील कृती करण्यास मोकळे असू, असा इशाराही परब यांनी दिला आहे.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉत हंगामा नाट्या केल्यानंतर सदर डॉक्टरच्या निलंबनाचा आदेश दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो नाकारला होता. त्यामुळे आरोग्यमंत्री आता सुडाने पेटून उठतील. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे. त्यासाठी ते ‘सत्तरी वेल्फेअर असोसिएशन’ नामक संघटनेचा आधार घेत असल्याचे वृत्त आहे. अशावेळी जर ते त्यात यशस्वी झाले तर त्याचे गंभीर परिणाम गोमेकॉतील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे, असे परब म्हणाले.
यावेळी परब यांनी ‘सत्तरी वेल्फेअर असोसिएशन’ कडून प्रसिद्ध करण्यात आलेले एक पत्रक दाखविले. त्यात राणे यांच्याकडूनच खऱ्या अर्थाने गोमेकॉला उर्जितावस्था मिळाली असल्याचे म्हटले आहे. तसेच राणे यांनीच सत्तरीचा विकास केला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. परब यांनी हे सर्व दावे खोडून काढले. जो लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघात निवास करत नाही तो कधीच लोकांचा विकास करू शकत नाही. उलटपक्षी राणे यांनी सत्तरीतील लोकांना आपल्या दोनापावला येथील निवासस्थानी फेऱ्या मारण्यास लावून त्यांच्यावर लाचारीची वेळ आणली असल्याचे परब म्हणाले.