महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निर्णायक टप्प्यावर...

06:59 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 20 तारखेला मतदान असून, त्यादृष्टीने पुढचा टप्पा महत्त्वाचा असेल. मागच्या दोन ते अडीच वर्षांत राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील लढत निकराची असेल. याशिवाय मनसे, परिवर्तन महाशक्ती तसेच बंडखोर वा अपक्षांचीही जंत्री या निवडणुकीत पहायला मिळते. हे बघता अनेक मतदारसंघांमधील निकाल हे अनपेक्षित तसेच धक्कादायक असू शकतात. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. सत्ता स्थापनेकरिता 144 च्या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचणे आवश्यक असेल. हे बघता कोणत्याही एका पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही. महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक दीडशेच्या आसपास जागा लढवत आहे. भाजपने 90 ते 105 जागांचे टार्गेट ठेवल्याचे मानले जाते. याशिवाय पक्षाने अनेक मतदारसंघांमध्ये पडद्यामागून बंडखोरांनाही बळ दिल्याचे सांगण्यात येते. पक्षाचे आमदार, प्लस बंडखोर व अपक्षांची साथ या बळावर आपला आकडा 125 च्या वर नेण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. तिथवर पोहोचता आल्यास पक्षाला केवळ 20 ते 25 जागांची आवश्यकता भासेल. ती शिंदे व दादा गटाच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. यातून आपले वर्चस्व टिकवणे आणि वाढवणे तसेच दोन्ही गटांना एका मर्यादेपर्यंत ठेवण्याचा भाजपचा हेतू स्पष्ट दिसतो. भारतीय जनता पक्ष हा मित्रपक्षांच्या बाबतीत अतिशय दिलदार पक्ष मानला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरेंच्या जागा पाडल्या, असा आरोप होतो. परंतु, त्याच भाजपाने पुढच्या काळात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद बहाल करण्याइतपत मनाचा मोठेपेणा दाखवला, हे कसे विसरता येईल? या निवडणुकीतही शिंदे व दादा गटाला रोखण्यासाठी भाजपाने रणनीती आखल्याचे बोलले जाते. मुळात प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी भाजपाकडून काही व्यूहरचना आखण्यात येत असेल, तर त्याला लबाडी वगैरे ठरविणे गैर होय. शिंदेंच्या गटाच्या काही उमेदवारांविरोधात तर मनसेलाही पुढे करण्यात आल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी बंडखोरांनी या गटाची कोंडी केली आहे. याला काळाचा महिमा, असेच म्हणता येईल. बाकी काही असले, तरी महायुतीमध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष असेल, हे नक्की. स्वाभाविकच ज्याच्या अधिक जागा आल्या, त्याला मुख्यमंत्रिपदाची संधी असेल. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव चर्चेत होते. अमित शहा यांनीही फडणवीस यांच्या विजयासाठी मतदान करण्याचे आवाहन केल्याने या चर्चेला उधाण आले होते. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्या विधानाने पुन्हा यात ट्विस्ट निर्माण झाल्याचे दिसते. मुख्यमंत्रिपदासाठी महायुती नवा चेहरा देऊ शकते, असे विधान तावडे यांनी केले आहे. त्यामुळे हा नवा चेहरा कोण राहणार, याबाबत उत्सुकता असेल. मागच्या काही दिवसांमध्ये भाजपला सातत्याने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सामना करावा लागला. लोकसभेत त्याची झळही पक्षाला बसली. याचा विचार करता पक्ष मराठा कार्ड खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास विनोद तावडे यांच्याशिवाय चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. धक्कातंत्री राजकारण हा भाजपाचा स्थायीभाव. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये पक्षाने हेच धक्कातंत्र वापरले. त्यामुळे महाराष्ट्रातही तसा प्रयोग झाला, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. अगदी पुन्हा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यापैकी कुणाकडेही नेतृत्व दिले जाऊ शकते. शिंदे व दादादेखील मनातल्या मनात मांडे भाजत असतील. परंतु, त्यांना कितपत संधी असेल, याविषयी साशंकता वाटते. फिफ्टी फिफ्टीची शक्यता गृहीत धरली, तर महाविकास आघाडीलाही संधी उपलब्ध होऊ शकते. आघाडीत सर्वाधिक म्हणजे 100 च्या आसपास जागा काँग्रेसने लढवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ ठाकरे आणि शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात दिसतात. लोकसभेचा स्ट्राईक रेट कायम राहिला, तर मुख्यमंत्रिपदाकरिता काँग्रेसलाही संधी असू शकते. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर अशी मोठी मांदियाळी आहे. त्या पलीकडे जाऊन नवीन चेहरा द्यायचा झाला, तर बंटी पाटील, संग्राम थोपटे यांच्यासारख्या नेत्यांचा त्यांना विचार करावा लागेल. राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, तर ठाकरेसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचीच नावे प्रामुख्याने आघाडीवर दिसतात. तथापि, मेरिटचा निकष मुख्यमंत्रिपदाकरिता महत्त्वाचा ठरण्याची शक्यता अधिक होय. वेगवेगळे सर्व्हे, त्यांचे पोल पुढे आले आहेत. त्यातही मतमतांतरे दिसतात. शेवटी जनता काय निर्णय देते, यावरच सर्व काही अवलंबून असेल. तथापि, या खेपेला अपक्षांची संख्या वाढू शकते. तसे झाले, तर सत्तेच्या दोऱ्या त्यांच्या हातात असू शकतात. अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो. परंतु, भाजपची गाडी 70, 75 पर्यंतच अडकली, तर मात्र हा प्लॅन फिसकटेल. आता हा सामना निर्णायक टप्प्यावर असून, तो पुढे काय वळण घेतो, हेच आता बघायचे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article