‘ज्योतिष’ची लग्नपत्रिका
लग्नसराईत आपल्या हाती विविध प्रकारांच्या लग्नपत्रिका पडत असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. अनेक लग्नपत्रिकांचे डिझाईन अतिशय कल्पकतेने बनविलेले असते. अशा पत्रिका कित्येकदा संग्रहीही ठेवल्या जातात. काही पत्रिका गूढरम्य पद्धतीच्या असतात. त्या पाहून आपण काहीवेळा चक्रावून जातो. अशा पत्रिका नेमक्या कोणत्या कारणास्तव काढल्या जात असतील, याचे अनुमान काढता येत नाही. सध्या अशाच एका लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे.
किनारुविला विडू येथील ज्योतिष आर. पिल्लई यांनी या पत्रिकेची रचना केली आहे. ती वरवर पाहता लग्नपत्रिकेसारखी न वाटता शिधापत्रिकेसारखी, म्हणजेच रेशन कार्डासारखी वाटते. त्यांनी अशा प्रकारच्या प्रकारच्या पत्रिकेची रचना केली, याचे कारण त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा रेशन दुकानाशी जवळचा संबंध आहे. ते लहान असताना त्यांच्या आईचे रेशन दुकान होते. स्वत: पिल्लईही आपल्या आईला साहाय्य करण्यासाठी तिच्या दुकानात जात असत. या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना ते ओळखत असत. हे ग्राहक त्यांना ‘रेशन दुकानातील लाडका’ असे संबोधत असत. त्यामुळे ते मोठे झाल्यानंतर जेव्हा त्यांचा विवाह ठरला, तेव्हा त्यांनी आपल्या विवाहाची पत्रिका रेशन कार्डाप्रमाणे मुद्रीत करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या रविवारी त्यांचा विवाह जी. एच. देविका यांच्याशी झाला. आपल्या विवाहाच्या पत्रिकेचे डिझाईन त्यांनी स्वत:च केले. ही रचना करण्यासाठी त्यांना 11 दिवस लागले. लहानपणापासून रेशन दुकानाशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध यांना या लग्नपत्रिकेत दर्शवायचे होते. त्यामुळे त्यांनी अतिशय दक्षतापूर्वक तिची रचना केली आहे. एखाद्या लग्नपत्रिकेत जी माहिती मुद्रित करणे आवश्यक असते, ती सर्व या पत्रिकेत आहे. तथापि, ही माहिती रेशन कार्डावरील मजकूर ज्या प्रकारचा असतो, त्या शैलीत मुद्रित करण्यात आली आहे. या पत्रिकेच्या पहिल्या मुख्य पानावर, ज्याप्रमाणे रेशन कार्डावर धारकांची नावे असतात, त्याप्रमाणे वधुवरांची नावे देण्यात आली आहेत. तसेच लग्नासंबंधीची इतर माहिती देण्यात आली आहे. मागच्या पानावर ज्या प्रमाणे रेशन कार्डावर कुटुंबातील इतर व्यक्तींची नावे असतात, तशीच या पत्रिकेवरही आहेत. मधल्या पानांवर अन्य माहिती आहे. पिल्लई यांच्या कुटुंबाचे हे रेशन दुकान पिढ्यानपिढ्या चाललेले आहे. त्यांचे पणजोबा भार्गवन पिल्लई हे या दुकानाचे मूळ मालक होते. त्यानंतर त्यांचे वडील के. के. पिल्लई यांनी ते सांभाळले. सध्या त्यांची आई ते चालवित आहे.