ज्योतिषाचा सल्ला...अशोक यांचा हल्ला...हास्याचा कल्ला
चौथ्या दिवशी सभागृहात फिरकी घेण्याचा प्रकार : सभागृहात पिकला एकच हशा
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत ज्योतिषशास्त्र, ज्योतिषांचा सल्ला, सत्ता वाटपासंबंधीचा करार आदींविषयी चविष्ट चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अनेकवेळा आपल्या राजकीय जीवनात ज्योतिषांचा सल्ला कसा उपयोगी पडला, याचा उल्लेख केल्यामुळे या विषयावर चर्चा झाली. मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी 11 डिसेंबर रोजी कामकाज बंद ठेवण्यात आले होते. कृष्णा यांच्या निधनाची बातमी समजताच डी. के. शिवकुमार तातडीने बेंगळूरला रवाना झाले होते. त्यामुळे विधानसभेत आपल्या आवडत्या नेत्याला त्यांना श्रद्धांजली वाहता आली नाही. गुरुवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी माजी आमदार आर. नारायण व जयण्णा एस. यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव आणला. हीच संधी साधून शिवकुमार यांनी कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली.
खरे तर आपण माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे शिष्य, राजकीय जीवनाच्या कठीणप्रसंगी बंगारप्पा यांनीच आपल्याला एस. एम. कृष्णा यांच्याकडे पाठविले. त्यांना राज्यसभेवर पाठविताना आपण व टी. बी. जयचंद्र यांचा वाटा मोठा होता. त्यानंतर पांचजन्य यात्रेच्या माध्यमातून कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली. आपणच एस. एम. कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार, त्यांच्या नावांची यादी बनविली. ही यादी राज्यपालांकडे पाठविताना मात्र आपले नाव नव्हते.
लगेच आपण ज्योतिषी द्वारकानाथ यांच्याशी संपर्क साधला. माझ्या नशिबात राजयोग आहे का? अशी विचारणा केली. राजयोग आहे, मात्र मंत्रिपद सहजपणे मिळणार नाही. तुला ते लाथ मारून मिळवावे लागणार, असे त्यांनी सांगितले. लगेच आपण एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तुम्हाला राज्यसभेवर पाठविण्यासाठी आपले योगदान आहे. पक्ष सत्तेवर आणण्यासाठीही तुमच्यासोबत मी काम केले आहे. माझ्याशिवाय सरकार बनवू देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. एस. एम. कृष्णा यांची पत्नी प्रेमा यांनी आम्ही एका ज्योतिषाचा सल्ला घेतला आहे. सध्या तुझी वेळ बरोबर नाही. त्यामुळेच तुझे नाव वगळण्याचे त्यांनी सांगितले. आपणही ज्योतिषाचा सल्ला घेतला असून लाथ मारून मंत्रिपद मिळविण्याचे त्याने सांगितले आहे, असे सांगताच शपथविधीच्या दिवशी राज्यपालांना पाठविलेली यादी थांबवून त्या यादीत आपले नाव घातले गेले, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी हाच धागा पकडून तुमच्यात अडीच वर्षांची सत्ता वाटून घेण्याचे ठरले आहे. यासंबंधी ज्योतिषांचे म्हणणे काय आहे? हेही जरा जाहीर करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्रिपद कधी ताब्यात घेणार? एस. आर. बोम्माई व एच. डी. देवेगौडा यांच्या भांडणात रामकृष्ण हेगडे यांचा फायदा झाला. तुमच्या बाबतीतही असे होऊ नये, त्यामुळे यासंबंधीही ज्योतिषाचे म्हणणे काय आहे? अशी विचारणा केली. यावर ज्योतिषाने आपल्याला काय सांगायचे ते सांगितले आहे. त्यांनी जे सांगितले आहे ते आपण जाहीर केले तर भाजप-निजदमधील किमान 25 ते 30 आमदार माझ्याकडे येतील, असे शिवकुमार यांनी सांगताच या चर्चेत हस्तक्षेप करीत ही गोष्ट उघडपणे सांगू नका, आर. अशोक यांना तुमच्या कार्यालयात बोलावून सांगा, असा सल्ला दिला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
शेतकऱ्यांना मोठे करण्याचे स्वप्न साकार
चंदनतस्कर वीरप्पनने डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले. त्यावेळी एस. एम. कृष्णा यांनी आपल्याला घरी बोलावून घेतले. वीरप्पन कसा मोठा झाला? एखाद्या सरकारला वेठीवर धरण्याएवढे त्याचे बळ कसे वाढले? अशी विचारणा त्यांनी केली. चंदन तस्करीमुळे वीरप्पन मोठा झाल्याचे आपण सांगताच शेतकऱ्यांना चंदनाची झाडे लावण्यासाठी कृष्णा यांनी लगेच मंजुरी दिली. सरकार आणि शेतकरी यांच्या समन्वयातून चंदनाची लागवड करून शेतकऱ्यांनाही मोठे करण्याचे स्वप्न एस. एम. कृष्णा यांच्यामुळे साकार झाल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.