२१ पासून आरोंदा-परेल बसफेरी सुरु होणार ?
ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाच्या चर्चेत आगार व्यवस्थापकांचे आश्वासन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले आगारातून बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली आणि काही वर्षापासून बंद केलेली तसेच राजकिय पक्षांच्या मागणीनुसार केवळ उन्हाळी हंगामातील सिझनमध्ये चालू करण्यात येणारी आरोंदा-परेल हि बस केवळ हंगामासाठी नव्हे तर पुर्वी प्रमाणे ३६५ दिवस चालू करावी. शेवटच्या गावातून सुटणाऱ्या अन कायम मुंबईस जाण्यास भारमान असणाऱ्या आरोंदा-परेल बस चालू करण्याची मागणी आज शनिवारी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांची भेट घेऊन केली. यावर चर्चा होऊन सोमवार दि. २१ एप्रिल पासून आरोंदा परेल बस नियमित चालू करण्याचे आश्वासन दिले. सदर बसचे बुकींग ऑनलाईन होण्यासाठी ती बस चालू झाल्याचे ऑनलाईन प्रवाशांना समजेल यासाठी एस.टी. महामंडळाच्या ऑनलाईन प्रणालीवर टाकण्याची सुचना शिष्टमंडळाने केली आहे.एस.टी. महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातील काही चालक व वाहक कर्मचाऱ्यांना महामंडळाचे नियम डावलून डुट्या बदलल्या जातात. एस. टी. महामंडळाचा अधिकारी वा कर्मचारी हा कोणत्याही पक्षाशी बांधिल नसतो. असे असताना वेंगुर्ले आगारातील काही कनिष्ठ दर्जाचे अधिकारी स्वतः ड्युटी लावतात. आणि विशिष्ट संघटनेच्या चालक-वाहकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे ड्युटी देतात. याबद्दल वेंगुर्ल आगारातील काही कर्मचाऱ्यांनी या अन्यायाबाबत एस. टी. कामगार ठाकरे सेनेच्या संघटनेकडे आपली खंत व्यक्त केली. त्यानुसार ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा उपजिल्हा प्रमुख संदेश निकम व एस.टी. कामगार ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी शनिवारी चालक-वाहक कर्मचाऱ्यांसमवेत वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांची भेट घेतली. या भेटी अनुप नाईक यांनी, महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी यांना महामंडळाचे जे नियम असतील त्याप्रमाणे छुटी दिली जावी. स्वतःच्या अधिकाऱ्यांत कोणावरही अन्याय होणार नाही हे पहावे. जर स्वतःच्या अधिकाराचा वापर कोणत्याही अधिकाऱ्याने करून अन्याय करण्याचा प्रयत्न केला. अधिकाराचा वापर कोणत्याही अधिकाऱ्याने करून अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर एस. टी. महामंडळाचे नियम समोर ठेवून केलेल्या कामाचा पोल खोल केला जाईल. महामंडळाचे नियम जसे आहेत. त्याप्रमाणे यापुढे कार्यवाही व्हावी. कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता वा पक्षातील पदाधिकारी यांच्या दबावाने चालक-वाहक कर्मचाऱ्यांवर अन्याय वरीष्ठ किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून अन्याय केला गेलास. नियमावली प्रमाणे जाब विचारला जाईल. यात अधिकाऱ्यांची पितळ उघडे पडेल यामुळे संबधित अधिकाऱ्यांचे नुकसान झाल्यास तेच जबाबदार रहातील. अशा इशाराही देण्यात आला. तसेच महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ६ ते सायंकाळी ७ यावेळेत ड्युटी देणे हे महामंडळाच्या नियमानुसार असताना वाहक महिला कर्मचाऱ्यांना तत्पुर्वी किंवा रात्री उशीराची ड्युटी दिली जात आहे. वेंगुर्ले आगारातून मुंबईस जाण्यास एकही बस नाही. पुर्वी डेपो स्थापनेपासून असंख्य वर्ष कार्यरत असलेली आरोंदा-परेल बस हि बंद केली गेली. त्यानंतर राजकी य पक्ष संघटना व नागरिक यांच्या मागणीनुसार उन्हाळी हंगामापुरती चालू करण्यात आली. वेंगुर्लेतून खाजगी लक्झरी ७ ते ८ बसेस दररोज जातात. त्यांना भारमान मिळते. पण वेंगुर्ले आगाराच्या बसला भारमान मिळत नाही. असे होवूच शकत नाही. पण बस सुरू करताना कांही दिवस ती ऑनलाईन रूटवर टाकली जाते. मात्र कांहीं दिवसांनी ती ऑनलाईन रूटवरून काढली जाते. त्यामुळे बस बंद केल्याचे समजून प्रवासी परीवहन मंडळाच्या वेंगुर्ले आगारातून एकमेव मुंबईस चाणाऱ्या आरोंदा-परेल बस चा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे २१ एप्रिलपासून सुरू करण्यात येणारी आरोंदा-परेल हि बस ३६५ दिवस कायम स्वरूपी चालू करण्यात यावी. तसेच पुणे येथे वेंगुर्ले तालुक्यातील अनेक जण नोकरीला जातात. त्यांना वेंगुर्लेतून थेट पुण्यास जाणारी बस नाही. अशा प्रवाशांना झिरो पॉईंटकडे पुण्यास जाणाऱ्या बस साठी सुमारे ५०० रूपये भुर्दंड पडतो. त्यामुळे सायंकाळी ४ वाजता पुणे येथे जाणारी एस. टी. बस फेरी चालू करण्यात यावी. अशी मागणी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी केली. त्यावेळी हि लांब पल्ल्याची गाडी असल्याने वेंगुर्ले आगारासाठी नवीन गाड्यांची मागणी विभागीय कार्यालयाकडे केलेली आहे. मात्र अद्याप गाड्या मिळालेल्या नाहीत. त्यातील गाड्या मिळल्यास येत्या आठ दिवसांपासून रातराणी पुणे बस सुरू करण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिली.