म. ए. युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मदत
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील हलशी विभागातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई उपस्थित होते. हलशी, हलशीवाडी, गुंडपी, नरसेवाडी, सागरे, नंजिनकोंडल या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, त्यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक व मराठी भाषिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. गुरुवारी हलशी येथे सरकारी मराठी शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अमृत शेलार यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शाळांमध्ये उत्तम सुविधा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खानापूर तालुका अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, राजाराम देसाई, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष नरसिंग घाडी, माजी ता. पं. सदस्य चंद्रकांत देसाई, मुख्याध्यापक एस. टी. पाटील, सहशिक्षिका पी. एस. माळवी, जी. व्ही. भाले, एम. जे. हत्यारे, जी. एन. घाडी, विशाल गुरव, दत्तात्रय देसाई, विनोद देसाई, नारायण देसाई, सुधीर देसाई यासह इतर उपस्थित होते.