‘शिवम’ची 427 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून शनिवारी पत्रक प्रसिद्ध, आठ ठिकाणी शोधमोहीम
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
दरमहा 3 टक्के परतावा देण्याचे सांगून शेकडो गुंतवणूकदारांना 2459 कोटी रुपयांना ठकवणाऱ्या शिवम असोसिएट्सचा सर्वेसर्वा शिवानंद निलण्णावर व त्याच्या साथीदारांकडून ईडीने 427.16 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती जाहीर केली आहे.
शिवम असोसिएट्सवर पोलीस, महसूल व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली होती. शिवबसवनगर येथील शिवानंद निलण्णावरचे कार्यालय व निवासस्थानी झालेल्या तपासणीनंतर माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीची एंट्री झाली होती.
शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी ईडीने जाहीर केलेल्या माहितीनुसार शिवानंद निलण्णावर व शिवम असोसिएट्स संबंधीची स्थावर-जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबर रोजी ईडीने शिवानंद व त्यांच्या इतर पाच सहकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. दरमहा 3 टक्के परतावा देण्याचे सांगून 35 हजारहून अधिक गुंतवणूकदारांकडून 2459 कोटी रुपये या संस्थेने जमा केले होते.
सध्याच्या माहितीनुसार शिवम असोसिएट्सकडून 2 हजार 125.60 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करायचे आहेत. शिवम असोसिएट्स संबंधीच्या मुदत ठेवी, शेअर बाजारातील गुंतवणूक, भूखंड खरेदीतील गुंतवणूक, बंगले, अपार्टमेंट आदींसह वेगवेगळ्या बँकांतील 367.77 कोटी रुपयांच्या ठेवी, 47 बँक खात्यातील 44.37 कोटी रुपये, 13 कोटी 68 लाख रुपये किमतीच्या 42 जमिनी ईडीने जप्त केल्या आहेत.
बेळगाव, चिकोडी, निपाणी येथे शिवानंद निलण्णावर व त्यांच्या साथीदारांशी संबंधित एकूण आठ ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी शिवानंद निलण्णावरला अटक करण्यात आली होती. 9 ऑक्टोबर रोजी मंगळूर येथील पीएमएलए न्यायालयात शिवानंदसह पाच जणांविरुद्ध फिर्यादही दाखल करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा देण्याचे सांगून जमवलेला पैसा अवैध मार्गाने वळविण्यात आला आहे. शिवम असोसिएट्सला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमुळे 185.95 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचाही उल्लेख ईडीने आपल्या पत्रकात केला आहे. 25 कोटी रुपये बेळगाव शहरातील दोन सोसायट्यांमध्ये गुंतवल्याचेही ईडीने स्पष्ट केले आहे. पत्नी संगीता, अल्पवयीन मुलगा व कुटुंबातील इतर सदस्यांच्या खात्यामध्ये, तसेच मे. शिवम शिवा प्रा. लिमिटेड, शिवम लाईफलाईन प्रा. लि., शिवम फूड्स आदींमध्ये पैसा वळविण्यात आला आहे. शिवम असोसिएट्स संबंधीची 427 कोटी 16 लाख 37 हजार 165 रुपये किमतीची स्थावर-जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
