विधानसभा अधिवेशन आज
पणजी : आज व उद्या शुक्रवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन आजपासून सुऊ होत असून 2025 या नवीन वर्षातील ते पहिलेच अधिवेशन असल्याने त्याचा शुभारंभ राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. सकाळी 11.30 वाजता हे अधिवेशन चालू होणार असून अभिभाषणानंतर फारसे काही काम असणार नाही. सदर अधिवेशनात विरोधी पक्षीय आमदारांनी सरकारला विविध विषयांवऊन जाब विचारण्याचे ठरविले आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रश्नोत्तर तास, शून्य तास तसेच दुपारच्या सत्रात आमदारांच्या खासगी ठरावावर चर्चा करण्यात येणार आहे. दोन दिवसांचे हे मर्यादीत अधिवेशन शुक्रवारी सायंकाळपर्यंत संपुष्टात येणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येणार असून ते सुमारे आठवडाभर तरी चालेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरापासून गाजत असलेले अनेक ज्वलंत विषय अधिवेशनात चर्चेला यावेत म्हणून विरोधी पक्ष आमदारांनी प्रयत्न चालवले असून त्या संदर्भात प्रश्नही मांडले आहेत. आता त्यातील किती प्रश्न चर्चेला येतात यावरच कामकाज अवलंबून रहाणार आहे. सत्ताधारी भाजप तसेच विरोधी काँग्रेस पक्षाने व इतर विरोधकांनी बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनिती ठरवली आहे. काही विषयांवऊन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.