हरियाणात आज विधानसभेसाठी मतदान
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणामध्ये सर्व 90 मतदारसंघात शनिवार, 5 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात एकूण 1,031 उमेदवार निवडणूक लढवत असून 2 कोटी 3 लाखांहून अधिक लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होत असून मतमोजणी मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील निकालही जाहीर होणार आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 1,559 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर 1,221 अर्ज वैध असल्याचे आढळून आले, तर 388 फेटाळण्यात आले. सध्या 1,031 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यात 930 पुऊष आणि 101 महिला आहेत. एकूण उमेदवारांपैकी 464 अपक्ष उमेदवार आहेत. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून शुक्रवारी निवडणूक अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. राज्यात एकूण 20,632 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. फरिदाबाद मतदारसंघात सर्वाधिक 1,650 केंद्रे आहेत, तर डबवली विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 400 केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी राखीव ईव्हीएमसह एकूण 27,866 ईव्हीएम (बॅलेट युनिट) वापरली जाणार असल्याची माहिती हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी दिली. तसेच शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील एकूण 2 कोटी 03 लाख 54 हजार 350 मतदारांमध्ये 1 कोटी 07 लाख 75 हजार 957 पुऊष तर 95 लाख 77 हजार 926 महिला आणि 467 तृतीय लिंगी मतदारांचा समावेश आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या एकाच टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार गुऊवारी संध्याकाळी संपला. हरियाणा निवडणुकीत भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याची आशा आहे. तर काँग्रेसला दशकभराच्या विश्र्रांतीनंतर पुनरागमनाची अपेक्षा आहे. हरियाणातील प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), तसेच इंडियन नॅशनल लोक दल-बहुजन समाज पक्ष आणि जननायक जनता पार्टी-आझाद समाज यांच्यातील निवडणूकपूर्व युतीचा समावेश आहे.