कोकणात विधानसभा निवडणुकीचे पडघम
लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुका एक-दीड महिन्यांवर होऊ घातल्या आहेत. त्यामुळे कोकणात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठे यश मिळवता आले नसले, तरी कोकणात मात्र यश मिळविता आले होते. विधानसभा निवडणुकीतही हे यश मिळविण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या सारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत सत्ताधारी पोहोचत आहेत.
जनता दरबार, आमसभांचा सपाटा सुरू केला आहे. दुसरीकडे कोकणात लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश पुसून टाकण्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळे मुद्दे घेऊन आंदोलने उभारली जात आहेत. त्यांनीही सभांचा सपाटा सुरू केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सप्टेंबर महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना, सर्वांना स्वत:चं अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करायचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाचे किती आमदार निवडून येणार, याची चाचपणी सुरू असून आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त आमदार असले पाहिजेत, यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. पूर्वीसारखी एकाच पक्षाची सत्ता आणि वर्चस्व राहिलेले नाही.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात मोदी सरकार आले खरे, परंतु महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात कौल दिला गेला. मात्र अशा परिस्थितीतही कोकणातील जनता भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या बाजूने राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सोबत होती. मात्र ती आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. महायुती व महाविकास आघाडी एकमेकांसमोर ठाकणार हे निश्चितच. परंतु ऐन निवडणुकीत कोण कुणाशी समझोता करेल, हे सांगता येणार नाही.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गबरोबरच रायगड, ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळाले असल्याने कोकणात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठीची बांधणी सुरू केली असून मतदारसंघातील ग्रामस्थांशी संवाद, विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत कोकणात यश मिळविले असले, तरी विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील पराभवाचा वचपा काढून महाविकास आघाडीच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीनेही बांधणी सुरू केली आहे.
सामान्य जनतेशी नेहमीच संपर्क, गाठीभेटी, संवाद यामुळे साहजिकच निवडून येण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जाते. या प्रयत्नांना यश येत गेले की, निवडणुकीचा आखाडा अधिक सोपा होत जातो. सध्या त्याच पद्धतीने जनतेशी संपर्कात राहणे महत्त्वाचे ठरत आहे. लोकसभा निवडणूक ज्या मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे, त्या मताधिक्याचा विचारही त्यामध्ये केला जात आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुका या वेगळ्या पद्धतीने लढविल्या जातील. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छुक दावे-प्रतिदावे करू लागले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची ओढ लागली आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण हळूहळू तापू लागणार आहे. मात्र तोपर्यंत निवडणूक पूर्वतयारीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात सत्ताधारी महायुतीकडून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सलग तीन दिवस प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबारच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातोय. निवडणुकीच्या तोंडावर जनता दरबार घेणे म्हणजे निवडणूकपूर्व फार्स आहे, असा आरोप केला असला तरी या जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम महायुतीकडून साध्य करण्यात आले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात आले. रेल्वे स्थानकात जाताना अगदी एअरपोर्टवर गेल्याचा भास होतो. या सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळाही दिमाखात साजरा करून लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न भाजप करतोय. जिल्हा पातळीवर भाजपने अधिवेशन घेऊन जिल्हा पदाधिकाऱ्यांना अॅक्टीव्ह केले. निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीने केले जाणारे कार्यक्रम म्हणजे निवडणूक पूर्व तयारीच म्हणावी लागेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या लोकप्रिय ठरलीय. या योजनेसह युती सरकारने नव्या सात योजना जाहीर केल्या असून या योजनांच्या माध्यमातून महिलांची वोट बँक जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावागावात जाऊन या योजनांचा प्रसार करून लोकांशी कनेक्टीव्हीटी वाढवण्याचे योजले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय सभांचा धडाका सुरु केलाय. आमसभाही घेतल्या जात असून विकासकामांच्या भूमिपूजनांचाही धडाका सुरु आहे. यावरून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील शिंदेसेना व भाजपने विधानसभेची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधकांनीही निवडणुकीची पूर्वतयारी सुरु केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचे समजते. विशेषत: काँग्रेस व शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत सत्ताधारी कसे अपयशी ठरत आहेत, असे आरोप लावून आंदोलने सुरू केली आहेत. सभांचाही धडाका सुरु केला आहे आणि जनतेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने कोकणात कमळ फुलवले व इतिहास घडविला. त्याप्रमाणे आता विधानसभेतही जास्तीत जास्त जागा भाजपकडे खेचून आणून त्या निवडून आणण्याच्या कामाला भाजप अगदी बुथ लेव्हलपासून कामाला लागलीय. याला तोडीस तोड व्युहरचना करण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर अर्थातच असेल. कोकण म्हटलं की, शिवसेनेचा बालेकिल्ला असे म्हटले जाते. या बालेकिल्ल्याला भाजपने लोकसभेत सुरुंग लावला होता. आता विधानसभा निवडणुकीत तो बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठीचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेनेही तयारी सुरू केलीय.
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असतानाच इच्छुक उमेदवारांची यादी मोठी असल्याने कुणाला उमेदवारी द्यायची, ही मात्र डोकेदुखी सर्वच पक्षांना ठरणार आहे. मात्र उमेदवारांनी आपल्याला कशी तिकिटे मिळतील, याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केलीय. येणाऱ्या दिवसात उमेदवारीबाबतची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकताना दिसेल. सर्वाधिक डोकेदुखी सावंतवाडी मतदारसंघात आहे. महायुती कायम राहिल्यास शिंदेसेनेचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे तिकीट पक्के आहे. मात्र भाजपकडून राजन तेली, संजू परब, विशाल परब यांच्यासारखे अनेकजण इच्छुक उमेदवार आहेत. त्यांचं काय होणार की दुसऱ्या पक्षात तिकिटासाठी प्रवेश करणार, हे बघावे लागणार आहे. महाविकास आघाडीमधूनही शरद पवार राष्ट्रवादीच्या अर्चना घारे, उबाठा सेनेकडून शैलेश परब इच्छुक आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची यादी अजूनही वाढणारी आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची सीट पक्की मानली जात आहे. मात्र भाजपकडून माजी खासदार नीलेश राणे, दत्ता सामंत यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून भाजपकडून आमदार नीतेश राणे यांची सीट पक्की आहे. सेनेकडून मात्र सतीश सावंत यांच्यासह संदेश पारकर, अतुल रावराणे आदी इच्छुकांची यादी मोठी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही राजापूर मतदारसंघातून सेनेचे आमदार राजन साळवी यांना तिकीट मिळेल. त्यांच्याविरोधात महायुतीकडून किरण सामंत यांना तिकीट मिळण्यासाठी जोर लावला जात आहे. रत्नागिरीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे तिकीट शिंदेसेनेकडून पक्के आहे. विरोधात महाविकास आघाडीला स्ट्राँग उमेदवार शोधावा लागणार आहे. तसेच गुहागरमधून उबाठासेनेचे आमदार भास्कर जाधव, खेडमधून शिंदेसेनेचे योगेश कदम, चिपळूणमधून अजित पवार गट राष्ट्रवादीचे संदेश निकम यांच्या विरोधातही तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. बरीच नावे चर्चेत असून निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी नावांची यादी वाढणार आहे.
संदीप गावडे