विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये
निवडणूक आयोगाकडून गोव्यातील अधिकाऱ्यांना सूचना : भाजप निवडणुकीस सज्ज
पणजी : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुका या डिसेंबर 2026 च्या अखेरीस होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने तसेच संकेत गोव्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोवा सरकारने देखील निवडणुकीची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून चालू केली आहे. प्राप्त माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोगाने गोव्यातील अधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासून कामाला लागा, अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये निवडणुका होतील, या उद्देशानेच सर्व तयारी सुरू करा, असेही कळविले आहे.
फेब्रुवारीत होणार जनणनेचे काम
भारतीय जनगणनेचे महत्त्वाचे काम फेब्रुवारीमध्ये (2027) सुरू होत आहे. त्यामुळे तिथे सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच शिक्षकांना देखील मदतीला घेतले जाणार आहे. त्यावेळी निवडणूक आयोगाला आवश्यक असलेला कर्मचारी, अधिकारीवर्ग उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे गोवा विधानसभेच्या निवडणुका साधारणत: डिसेंबरमध्ये घ्याव्या लागणार आहेत.
डिसेंबर ते जानेवारीत निवडणुका
गोवा विधानसभेची मुदत 23 मार्च 2027 रोजी संपुष्टात येत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांचीही मुदत मार्च 2027 मध्ये संपुष्टात येत आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण केल्या जातील. त्यानंतर जनगणनेचे अंतिम टप्प्यातील काम सुरू होईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या गोव्यातील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीस लागा, असे कळविलेले आहे.
भाजप दोन महिन्यांपूर्वीच लागला कामाला
सध्या भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. भाजपने गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीचे काम सुरू केले आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबर मध्येच होतील, याची भाजपला देखील खात्री झालेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या डिसेंबरमध्ये होतील, हे लक्षात घेऊनच सरकार पातळीवर मुख्यमंत्र्यांनी आणि गावागावांमध्ये तसेच मतदारसंघांमध्ये देखील जोरदार कार्यक्रम सुरू केले आहेत. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी सध्या पक्षांतर्गत बैठकांचा जोर चालू केला आहे. गुऊवारी पेडणे तालुक्यात वजरी या ठिकाणी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
निवडणुकीस आम्ही तयार : नाईक
प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी गोव्यात कोणत्याही वेळी निवडणुका झाल्या तरी आम्ही तयार आहोत, असे यापूर्वीच सांगितलेले आहे. गेले दोन महिने भाजपने गोव्यात सर्वत्र प्रचारकार्य सुरू केले आहे. त्याचबरोबर गोवा विधानसभेचे संपूर्ण अधिवेशन देखील मार्चमध्ये घेण्याचा जो निर्णय झाला होता
त्यामागील खरे कारण निवडणुका डिसेंबरमध्ये होणार, हेच होते.
सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन पक्षकार्य हाती घेतले आहे. पक्षाने संघटनात्मकदृष्ट्या सर्वत्र काम सुरू केले असून निवडणुका डिसेंबरमध्ये होतील, या उद्देशाने तयारी पूर्ण केली आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका होतील, याची अन्य राजकीय पक्षांना अद्याप कल्पना नाही. त्यामुळे काँग्रेसने अद्याप विधानसभा मतदारसंघांत काम सुरू केलेले नाही. आता त्यांना देखील तातडीने काम हाती घ्यावे लागणार आहे. पुढील सहा महिन्यात निवडणुका होतील, हा अंदाज सत्ताधारी पक्षाला आहे. परंतु इतर राजकीय पक्षांना त्याची कल्पना देखील अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र निवडणुकीसाठी तयारी करण्याचे काम अधिकारीवर्गाने सुरू केले आहे.
पाच राज्यांच्या डिसेंबरमध्ये निवडणुका
येत्या डिसेंबरमध्ये गोव्याबरोबरच पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आणि पूर्वोत्तर राज्यातील एका राज्याची निवडणूक होणार आहे.