विधानसभा कामकाज समितीची 23 रोजी बैठक
पणजी : नूतन वर्षात होणाऱ्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी विधानसभा कामकाज समितीची बैठक गुऊवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता विधानसभा संकुलात घेण्यात येणार असून, दोन दिवशीय अधिवेशनाचे कामकाज त्यात ठरविले जाईल, अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी दिली. विधानसभा अधिवेशन 6 व 7 फेब्रुवारी असे दोन दिवस असेल. वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने त्याची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. गुरूवारी 6 फेब्रुवारी रोजी राज्यपालांचे अभिभाषण होईल. त्यानंतर अन्य कोणतेही कामकाज होणार नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने खासगी कामकाजाचा दिवस असेल. या कामकाजात आमदारांकडून आलेल्या खासगी ठरावावर चर्चा होईल. परंतु शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना तसेच खासगी ठराव किती घ्यायचे, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. विधानसभा कामकाज समितीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आपचे आमदार वेंझी व्हिएगस हे कामकाज सल्लागार समितीचे सदस्य आहेत.