उसगांवात युवकावर प्राणघातक हल्ला,दोघा सराईतांसह पाच जणांवर गुन्हा
फोंडा : उसगांव येथील नेस्ले कंपनीजवळ एका युवकावर वाहन पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात फोंड्यातील दोन सराईत गुन्हेगारांनी त्याच्यावर लोखंडी सळीने वार करीत खुनीहल्ला केल्याचा प्रकार काल सोमवारी सकाळी उघडकीस आला. संदेश गावकर असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून तो बांबोळी येथील गोमेकॉत उपचार घेत आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री संदेश गावकर याच्यावर सराईत गुन्हेगार सचिन कुट्टीकर (तिस्क-उसगांव) व अमोघ नाईक (बोरी) यांच्यासह सुमारे 5 जणांनी प्राणघातक हल्ला चढविल्याची तक्रार स्वाती गावकर यांनी फेंडा पोलिसस्थानकात दाखल केली आहे. सध्या दोघेही संशयित फरार असून याप्रकरणी निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन नाईक अधिक तपास करीत आहे.
गुन्हेगारांनी भिवपाची गरज ना?
काल एका अल्पवयीनावर अॅसिड हल्ला, सामान्य जनतेला गावगुंडांकडून होणारे प्राणघातक हल्ल्यामुळे राज्यात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गृह खाते सपशेल अपयशी ठरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ‘भिवपाची गरज ना’ हे घोषवाक्य सध्या सराईत गुन्हेगारांसाठी सोयीस्कर ठरलेले आहे. सामान्य जनतेला गुन्हेगारांच्या भितीच्या छायेखाली वावरण्याची वेळ आलेली आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारांना अभय मिळू लागल्याने खाकीचा वचक कमी झाल्याची परिस्थिती एकंदरीत दिसून येत आहे.